वार्ताहर / माशेल
खांडोळा-माशेल येथील प्रसिद्ध श्री महागणपती संस्थानतर्फे गणेश जयंती नवरात्रोत्सवाला रविवार 14 पासून सुरूवात झाली. पालखी प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळयाने गणेश जयंती नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला.
काल सोमवारी झालेल्या गणेश जयंती उत्सव महादेव शेणवी खांडेपारकर व कुटुंबियांतर्फे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी पंचस्थानासह, महाभिषेक, दुपारी कीर्तन, त्यानंतर गणेश जन्म सोहळा, सायंकाळी 6 वा. लालखी व पालखी उत्सवानंतर आरती व तीर्थप्रसाद झाला. कोरोना मार्गदर्शक नियमाचे पालन करीत भाविक उत्सवात सहभागी झाले. सदर उत्सव 25 फेब्रुवारीपर्यत चालणार असून रोज सकाळी धार्मिक विधी व सायंकाळी पालखी उत्सव. यंदा कोविड महामारीमुळे गणेश जयंती उत्सव मर्यादीत स्वरूपात संस्थानचे पुजारी व कार्यकारी समितीतर्फे साजरा करण्यात येत आहे. यंदा महाप्रसाद रद्द करण्यात आला असून दरवर्षी उत्सवादरम्यान सायंकाळी 8 वा. होणारा पालखी उत्सव यंदा सायं. 6 वा. होणार आहे. बुधवार 24 रोजी गौड पादाचार्य कवळे मठ यांचे 6 वा. आगमन त्यानंतर पालखी उत्सव होईल. गुरूवार 25 रोजी सकाळी अभिषेक दुपारी आरत्या, सायंकाळी भजन, कीर्तन, लालखी, पालखी व रथोत्सव होईल. त्यानंतर आरती व तीर्थप्रसादाने गणेश जयंती नवरात्रोत्सवाची सांगता होईल.