प्रतिनिधी /खानापूर
येत्या सोमवार दि. 17 जानेवारी रोजी होणारा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत तसेच सकाळी 8.30 वाजता स्टेशनरोडवरील कै. नागाप्पा होसूरकर स्मारकाजवळ हुतात्म्याला अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करणाऱया पत्रकाचे वितरण म. ए. समितीच्यावतीने शहरात पदयात्रा काढून करण्यात आले.
या पत्रकात माजी आमदार दिगंबर पाटील तसेच म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते देवापण्णा गुरव यांच्या सहय़ा आहेत. जागृती पत्रकाचे वितरण करताना अनेकांनी म. ए. समिती एका झेंडय़ाखाली येऊन हुतात्मा दिन साजरा करत आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट असून असेच ऐक्य कायम राखा, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त करून झालेल्या एकीबद्दल समाधान व्यक्त पेले.
यावेळी काढलेल्या पदयात्रेत माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, जयराम देसाई, विठ्ठल गुरव, महादेव घाडी, बी. बी. पाटील, डी. एम. गुरव, पुंडलिक पाटील, विशाल पाटील, अमृत पाटील, शंकर पाटील, रविचंद्र पाटील, विवेक गिरी तसेच म. ए. समितीच्या एकीसाठी प्रयत्न करणारे कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेची सुरुवात येथील राजा शिवछत्रपती स्मारकापासून करण्यात आली.