प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असताना कोरोनावर मात करून कोरोनामुक्त होणाऱयांच्या संख्येतही वाढ होत आहे. तालुक्यात मंगळवारी आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार आणखी 18 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 339 वर पोहचली असून आतापर्यंत 265 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या पाच महिन्यात तालुक्यातील जवळजवळ 7 हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आता थोडक्याच रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. अशा परिस्थितीत तालुका संपूर्णपणे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.
मंगळवारी सापडलेल्या 18 कोरोना बाधितांमध्ये खानापूर शहरातच 10 बाधीत सापडले असून येथील आंबेडकर गल्लीतील 65 वर्षीय महिला, दुर्गानगर येथील 40 वर्षीय महिला तर 45 व 40 वर्षीय पुरुष, बंडर गल्ली येथील 23 वर्षीय महिला, सरकारी दवाखाना येथील 52 वर्षीय महिला, पोलीस स्टेशन येथील 28 वर्षीय पुरुष तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 45 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथे 50 वर्षीय पुरुष तसेच शहरातील इतर भागात 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. उर्वरित 8 कोरोनाबाधित तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून त्यामध्ये गांधीनगर येथील 21 वर्षीय महिला, बिडी येथील 62 वर्षीय पुरुष, इटगी येथील 36 वर्षीय पुरुष, असोगा येथील 32 वर्षीय महिला, शिंपेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, जटगा येथील 74 वर्षीय वृद्ध, कामशिनकोप्प येथील 25 वर्षीय महिला तर लक्केबैल येथील 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.