वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातमध्ये जैवसुरक्षित वातावरणातही कोव्हिड 19 ची भीती वाढत असतानाच राजस्थान रॉयल्सला एक चांगली बातमी मिळाली आहे. त्यांचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिक दुबईमध्ये दाखल झाले असून हॉटेल रूममधूनच ते खेळाडूंच्या ट्रेनिंगवर लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहेत.
राजस्थान रॉयल्स संघ दुबईला प्रयाण करण्याच्या एक आठवडा आधी 37 वर्षीय दिशांत याज्ञिक यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे यातून पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना भारतातच राहण्यास सांगण्यात आले होते. त्यांची चाचणी आता निगेटिव्ह आली असल्याने ते दुबईला रवाना झाले असून सध्या क्वारन्टाईनमध्ये आहेत. मात्र हॉटेल रूममधूनच त्यांनी खेळाडूंच्या सरावावर लक्ष ठेवले आहे. ‘संघात सामील झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून प्रारंभीचा सरावाचा कालावधी हुकला असला तरी मी लवकरच प्रत्यक्ष मैदानावर जाऊन मार्गदर्शन करण्यास उत्सुक झालो आहे. सर्व खेळाडू, माझे सहकारी व साहायक स्टाफच्या सतत संपर्कात असून ट्रेनिंगबाबत त्यांच्याशी चर्चाही करीत आहे. स्पर्धा जिंकणे हेच आमचे मुख्य लक्ष्य असून त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत,’ असे ते म्हणाले. 2018 पासून ते या संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याआधी ते संघाचे यष्टिरक्षक होते.