डॉल्बीच्या निनादात लुटला आनंद : बहुतांश ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरासह तालुक्मयाच्या ग्रामीण भागात मंगळवारी रंगपंचमी अत्यंत उत्साहात साजरी झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे रंगपंचमीचा उत्सव साजरा झाला नव्हता. यावर्षी रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी अत्यंत उत्साहात तरुणाई रस्त्यावर आली होती. खानापूर शहरात स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिर, केंचापूर गल्ली, निंगापूर गल्ली, रवळनाथ मंदिर परिसरात युवावर्गाने डॉल्बीच्या निनादात व पाण्याच्या फवारणीसह रंगोत्सवाचा आनंद लुटला.
यावर्षी लक्ष्मी मंदिराजवळ रंगपंचमी आगळय़ा पद्धतीने साजरी करण्यात आली. रंग फवारणीसाठी कारंजा उभारण्यात आले होते. डॉल्बीच्या निनादासाठी पेनचे साहाय्य घेतले होते. सकाळी 8 पासूनच रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी बालकांसह युवावर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही रंगोत्सवात सहभाग घेतला. यावेळी विविध रंगांची फवारणी करण्यात येत होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
लक्ष्मी मंदिरासह शहरातील निंगापूर गल्ली, केंचापूर गल्ली, रवळनाथ मंदिर चौक तसेच शहरातील विविध भागात ढोल-ताशा, डॉल्बीच्या आवाजात तरुणाई नाचण्यात दंग झाली होती. शहरातील रस्त्यारस्त्यांवरून युवा पिढीचे जथ्थे रंगांची उधळण करत फिरत होते. रंगपंचमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांचे सहकारी विशेष लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे अनेक राजकारणीही रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले होते. दुपारी 12 पर्यंत रंगपंचमी सुरूच होती.
या शिवाय जांबोटी क्रॉस, हलकर्णी, गांधीनगर या ठिकाणीदेखील रंगपंचमीचा अमाप उत्साह दिसून येत होता. काही ठिकाणी मुली व महिलांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. खानापूर ग्रामीण भागात शालेय मुला-मुलींनी एकत्रित येत रंगपंचमीचा आनंद लुटला. काही तरुणींसह महिलांची संख्याही लक्षणीय होती. काही वृद्ध महिलांनीही संगीताच्या तालावर ठेका धरला. सकाळी सातपासूनच रंगपंचमीला सुरुवात झाल्याने सर्व व्यवहार बंद होते. पण दुपारनंतर सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले.
ग्रामीण भागातही जल्लोष
खानापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. त्यापैकी करंबळ, रुमेवाडी आदी भागात सोमवारीच रंगपंचमी साजरी करण्यात आली. हलकर्णी, गांधीनगर, जांबोटी, नागुर्डा, होनकल, मळवसह इतर काही गावात रंगपंचमीला सुरुवात झाली. जांबोटी येथे दुपारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. खानापूर येथे सकाळपासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाल्याने प्रवाशांची ये-जा कमी होती. ग्रामीण भागातही तरुणींसह महिलांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला. यंदा बहुतांश ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आल्याने समाधानाचे वातावरण होते.
होलिकोत्सवासह रंगपंचमी साजरी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबी, चिगुळे, पारवाड, चोर्ला, बेटणे, हेम्माडगा, जामगाव, गवाळी, पास्टोली, आमगाव आदी ठिकाणी पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रंगमाले, नाटक, भजन कार्यक्रमांचा समावेश होता. याची सुरुवात गुरुवार दि. 17 पासून झाली.
विशेष म्हणजे या सर्व गावांतील लोक नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्यात व महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात राहतात. हे सर्व लोक होलिकोत्सवासाठी पाच दिवस आपल्या गावी येतात. सर्वजण मिळून आनंदाने हा सण साजरा करतात. या सर्व ठिकाणचा होलिकोत्सव पाहण्यासारखा असल्याने इतर गावांतील लोकही त्या ठिकाणच्या होलिकोत्सवात सहभागी झाले होते. एकूणच खानापूर शहर आणि तालुक्यात सर्व ठिकाणी होलिकोत्सवासह रंगपंचमी मोठय़ा उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.