प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकारकडून बँकांच्या खासगीकरणाचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापूर्वी अनेक बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले असतानाही आता खासगीकरण करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. अद्याप खासगीकरण करण्यात येणाऱया बँकांची नावे जाहीर नसली तरी त्याला बँक कर्मचाऱयांचा विरोध आहे. शुक्रवारी कॅम्प येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन बेळगाव शाखेच्यावतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये बँकाबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या. बँकांचे खासगीकरण करून सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच सतत कामगार विरोधी कायदे लागू करून त्यांच्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारी कंपन्यांमधील खासगी गुंतवणूक वाढविली जात आहे. खासगीकरणामुळे बँक कर्मचाऱयांवर अन्याय होणार असल्याने याला कर्मचाऱयांचा विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्टेट बँक ऑफ इंडियासमोर बेळगाव परिसरातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या कर्मचाऱयांनी निदर्शने केली. एकजुटीने यापुढेही विरोध करण्याचा इशारा देण्यात आला. पुढील महिन्यात दोन दिवस या निर्णयाच्या निषेधार्थ बँका बंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे सरकारने वेळीच खासगीकरण रोखण्याचे आवाहन करण्यात आले.