येडियुराप्पा यांचे प्रतिपादन : जेएसडब्ल्यूच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेवर नियंत्रण आणि बाधितांच्या उपचारासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना खासगी कंपन्या देखील हातभार लावत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. बेंगळुरात बुधवारी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून निर्माण केलेल्या 1000 ऑक्सिजन बेडच्या कोविड केअर सेंटरचे व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण करून ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया लाटेने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत कोविड केअर सेंटर जीवदान ठरत आहेत. या सेंटरना नियमितपणे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जेएसडब्ल्यू स्टील प्लांटपासून 4.8 कि. मी. लांबीची पाईपलाईन व्यवस्था करण्यात आली असून ही सुविधा केवळ 15 दिवसांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांना थेट ऑक्सिजन उपलब्ध करण्याची संकल्पना राबविलेल्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
या कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन बळ्ळारी जिल्हा प्रशासन सांभाळणार आहे. डॉक्टर, तज्ञांसह इतर कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून 24 तास सेवा दिली जाणार आहे. राज्यात गेल्या एका वर्षाच्या कालावधीत कोरोनावर नियंत्रण आणण्यासह सरकारी रुग्णालयातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. खासगी वैद्यकीय कॉलेजमध्ये ऑक्सिजन उत्पादन केंद्र स्थापण्यासाठी सरकारकडून निधी दिला जात आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले.
राज्यातील वाढत्या ऑक्सिजन मागणीवर उपाययोजना करण्यासाठी तीन कलमी धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार लिक्विड ऑक्सिजन पुरवठा वाढविणे, ऑक्सिजन जनरेटरद्वारे स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन उत्पादन वाढविणे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व सिलिंडर्सची खरेदी करून ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यात खासगी कंपन्या, स्वयंसेवी संघटना, धार्मिक संस्थांचाही वाटाही मोलाचा आहे, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.