प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी आयसीयू बेड व कोरोना बेडची संख्या तात्काळ वाढवावी असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनीही आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्याचा अभ्यास करून अशा वाढीव सुविधा करण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
पत्रकात मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, कोरोना महामारीच्या संदर्भाने खासगी दवाखान्याबद्दल काही कमी-अधिक तक्रारी असतीलही. तरीसुद्धा कोविडबाबत त्यांनी केलेले काम चांगले आहे. ते चांगले काम करीत आहेत. कोरोनाच्या वाढतच चाललेल्या संसर्गामूळे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषता कोल्हापूर शहरातील खासगी दवाखान्यावरील ताण वाढत चालला आहे. याची आम्हाला कल्पना आहे.
ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते खासगी दवाखान्यात ऍडमिट होण्याचा आग्रह धरतात. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत आणि सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याची इच्छा नाही, असे लोकही खाजगी दवाखान्यांमध्ये जाण्याचा आग्रह धरतात. त्याशिवाय आपल्याला लागूनच जवळच असलेल्या कोकणामधून, सांगली व इतर जिल्ह्यातून तसेच जवळच असलेल्या कर्नाटकच्या भागांमधून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक दवाखान्यात अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व लोकांना बेड उपलब्ध होतील, याबाबत दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.
आर्थिक कुवत असणाऱ्यांची हॉटेलमध्येच व्यवस्था करा……
मुश्रीफ यांनी म्हटले आहे, ज्यांना लक्षणे नाहीत परंतु ज्यांची आर्थिक कुवत आहे, असे लोक खाजगी दवाखान्यामधून बेडची मागणी करतात व ही सुविधा वापरतात. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या व ज्यांना खरोखरच बेडची गरज आहे, अशा लोकांना उपचारांपासून वंचित रहावे लागते. खाजगी दवाखान्याना माझी विनंती आहे, कि अशा दवाखान्यांनी रुग्णांना हॉटेलची व्यवस्था करावी व त्यांना हॉटेलमध्येच उपचार द्यावेत. यातून अत्यावश्यक रुग्णांना बेड कसे मिळतील ? यासाठी महापालिका आयुक्तांनी सक्षम व गतिमान यंत्रणा तयार करावी.