प्रतिनिधी/बेळगाव
कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची सूचना शासनाने केली आहे. मात्र, बेड रिकामी नसल्याचे सांगून काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे यावर नजर ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून, विविध खासगी रुग्णालयांना भेटी देऊन कोरोना रुग्णांना उपचार मिळत आहे की नाही याची माहिती घेण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. परिणामी रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी राज्य शासनाने खासगी रुग्णालयांची निवड करून त्यांना आदेश बजावण्यात आला आहे. काही खासगी रुग्णालयांनी कोविड सेंटर सुरू करून बाधितांना उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र शासनाच्या आदेशानंतरही काही खासगी रुग्णालयांनी बाधितांवर उपचार करण्यास टाळाटाळ चालविली आहे. काही ठिकाणी बेड रिकामी नसल्याचे सांगून रुग्णांना परत पाठविण्यात येत आहे. अशा रुग्णालयांची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने महापालिकेच्या माध्यमातून समिती स्थापन करून चाचपणी करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात चार विभाग करण्यात आले असून, प्रत्येक विभागात चार अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार अधिकाऱयांच्या समितीच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या रुग्णालयांना भेटी देऊन कोरोनाबाधितांवर उपचार होत आहेत का? याची माहिती घेण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड आरक्षित ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना बेड मिळाले नसल्यास त्यांना खासगी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. त्या ठिकाणी रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत का? याची माहितीदेखील घेण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांनी गेल्या काही दिवसांपासून चाचपणीची मोहीम हाती घेतली असून, आवश्यक तपशील घेण्यात येत आहे. जर 50 टक्के बेड आरक्षित न ठेवल्यास किंवा रुग्णांवर उपचार न केल्यास त्यांच्या विरोधात अहवाल देण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.