बेळगाव /प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सरकारी हॉस्पिटल्सवरील ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा देण्याकरता खासगी डॉक्टरांनी आपल्या ओपीडी त्वरित सुरू कराव्यात, अशी सूचना जिल्हय़ाचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली आहे.
शनिवारी सकाळी येथील सर्किट हाऊसवर अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी सर्व खासगी दवाखाने नियमित स्वरूपात सुरू करण्याबाबत सूचना केल्या. तसेच बैठकीनंतर या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली. कोरोना विकारामुळे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनावरील ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत इतर नियमित स्वरूपातील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी काही समस्या निर्माण होत आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी आता खासगी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा तसेच राष्ट्रीय कर्तव्य समजून रुग्णसेवेसाठी आपल्या ओपीडी खुल्या कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. तसेच आरोग्य खात्याने याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
शहर आणि परिसरात तीन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे निश्चित झाल्यानंतर शहरातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याचे पालन शिस्तबद्धरितीने व्हावे. तसेच या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन देखील गांभीर्याने करावे, अशी सूचना पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली.
बैठकीला खासदार सुरेश अंगडी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे, खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्याच्या महिला व कुटुंब कल्याणमंत्री शशिकला जोल्ले, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळी, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निमबर्गी, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आदी उपस्थित होते.