संशयित शैलेश तांबेसह दुचाकीवर दिसला : मात्र, अद्याप ओळख नाही
वार्ताहर / कणकवली:
असलदे येथील माळरानावरील मांगरातील खूनप्रकरणी कणकवली पोलिसांनी संशयित शैलेश संजय तांबे (28, असलदे-बौद्धवाडी) याच्यासोबत मडगांव गाठून मृत परप्रांतीयाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सदरच्या कामगाराचे नाव ‘सलमान’ असे असून तो साधारण चार महिन्यांपासून मडगांव येथे होता, अशी माहिती पुढे आली आहे. तर हा कामगार शैलेश याच्यासमवेत असलदे येथे जात होता, त्यावेळी नांदगांव तिठा येथे ‘सीसीटीव्ही’मध्ये व तत्पूर्वी एक ऑगस्टला मडगाव येथील महानगरपालिकेनजीकच्या ‘सीसीटीव्ही’मध्येही दिसून आला आहे.
साहजिकच हा कामगार नेमका कसा दिसतो, हे समजले आहे. मात्र, त्याला ओळखणारे मडगाव येथेही कुणी नसल्याने त्याचे गाव, नेमके नाव समजू शकलेले नाही. दरम्यान, या खूनप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या शैलेश याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
सदरची घटना 2 ऑगस्टच्या रात्री घडली होती. शैलेश याने त्या परप्रांतीय युवकाला काम देण्याच्या बहाण्याने असलदे येथील माळरानावरील मांगरात नेत भरपूर दारू प्यायला लावून जाळून मारले. तसेच आपणच आत्महत्या केली, असा बनाव रचून पळून गेलेला शैलेश तब्बल 22 दिवसांनी पोलिसांसमोर जखमी अवस्थेत प्रकटला होता. काही दिवसाच्या उपचारानंतर त्याला अटक झाली होती.
अटकेनंतरच्या कोठडी कालावधीत कणकवली पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव, असलदे परिसर गाठत परिसरातील ‘सीसीटीव्ही’ तपासले. यात शैलेश हा त्या परप्रांतीय कामगारासोबत नांदगावहून असलदे येथे दुचाकीने जाताना दिसत आहे. तो कामगार शैलेश याच्या मागे बसलेला दिसून आला. मात्र, शैलेश याने जाळून मारलेला कामगार हाच आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी मडगाव गाठत तेथील ‘सीसीटीव्ही’ तपासले.
यामध्ये हा कामगार मडगाव येथील महानगरपालिका परिसरातील ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसून आला आहे. सदरचे ‘फुटेज’ एक ऑगस्टचे आहे. याबाबत तेथील अन्य कामगारांकडेही पोलिसांनी चौकशी केली. हत्या झालेला कामगार हा साधारण चार महिन्यांपासून मडगाव येथे होता. फूटपाथ अथवा बसस्टेशनवर त्याचे वास्तव्य असायचे. त्या सुमारे पंचविशीतील तरुणाचे नाव ‘सलमान’ होते, एवढीच माहिती पोलिसांना मिळाली आहे.
‘सलमान’ याला कुणी ओळखत असल्यास, त्याच्याविषयी कुणाकडे अधिक माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन एपीआय सागर खंडागळे (9270363328) यांनी केले आहे.