प्रतिनिधी/ खेड
खेड पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाला असून पंचायत समितीच्या सभापतींसह त्यांचे स्विय सहाय्यक व वाहनचालकाचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून सोमवारपासून पंचायत समितीत आठवडाभर प्रवेशबंदी करण्यात आली असून मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकण्यात आले आहे.
ग्रामीण भागातून विविध दैनंदिन कामकाजासाठी येथील पंचायत समितीत सतत वर्दळ असते. सलग दोन दिवस सुट्टीनंतर सोमवारी नागरिकांची अधिक गर्दी उसळण्याची शक्यता होती. याचवेळी पंचायत समिती सभापतींसह अन्य दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणांची धावाधाव सुरू झाली.
पंचायत समिती सभापतींच्या कुटुंबातील 5 सदस्यांसह संपर्कातील अन्य व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुढे आली आहे. पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने आठवडाभर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
दोनच दिवसापूर्वी एका जि. प. सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. यापाठोपाठ पंचायत समिती सभापतींनाही कोरोनाची बाधा झाल्याने नागरिकांसह प्रशासकीय कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी आरोग्य कर्मचाऱयांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता पंचायत समितीच्या सभापतींसह अन्य दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सारेच धास्तावले आहेत.