अघोषित मालमत्तेचा खुलासा
नवी दिल्ली
तामिळनाडूतील ख्रिश्चन धर्मप्रचारक पॉल दिनाकरन यांच्या ठिकाणांवरील प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांदरम्यान 118 कोटी रुपयांच्या अघोषित मालमत्तेचा खुलासा झाला आहे. दिनाकरन यांच्या संस्थांवर करचोरीचा आरोप असून याच कारणास्तव विभागाने त्यांच्या 25 ठिकाणांवर छापे टाकले होते. चेन्नई आणि कोईम्बतूरमध्ये दिनाकरन यांची संस्था जीझस कॉल्स मिनिस्ट्रीजशी संबंधित 25 ठिकाणांवर 20 जानेवारी रोज छापे टाकण्यात आले होते. दिनाकरन हे कारुण्य विद्यापीठाचे (अभिमत) कुलपती आहेत. दिनाकरन यांच्या ठिकाणांवरील छाप्यांची कारवाई शनिवारी संपुष्टात आली. कोइम्बतूरमध्ये दिनाकरन यांच्या निवासस्थानातून 4.7 किलो सोने मिळाले असून ते जप्त करण्यात आले होते. तसेच 118 कोटी रुपयांच्या अघोषित मालमत्तेचाही खुलासा झाला आहे. छाप्यादरम्यान सापडलेल्या दस्तऐवजांची छाननी सुरू आहे.