विरोधी पक्षनेत्याच्या अटकेच्या विरोधात जनता रस्त्यावर : 2 हजारांहून अधिक निदर्शक पोलिसांच्या ताब्यात
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियातील विरोधी पक्षाचे नेते अलेक्सी नवाल्नी यांच्या अटकेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. 44 वर्षीय अलेक्सी यांना राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा मुख्य विरोधक मानले जाते. अलिकडेच रशियात परतलेल्या नवाल्नी यांना अटक करण्यात आली होती. यामुळे नाराज हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून स्वतःचा संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात 70 पेक्षा अधिक शहरांमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चांदरम्यान मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये हिंसाचार घडला आहे. निदर्शकांची पोलिसांसोबत झटापटही झाली आहे. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. दोन हजारांहून अधिक निदर्शकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि युरोपीय महासंघाने अलेक्सीच्या यांच्या मुक्ततेची मागणी केली आहे.
प्रोटेस्ट मॉनिटर ग्रुप ओव्हीडी-इन्फोनुसार एकूण 2131 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात मॉस्कोमध्ये 300 तर सेंट पीटर्सबर्गमधील 162 जण सामील आहेत. सुमारे 70 शहरांमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मॉस्कोच्या पुश्किनकाया चौकात 4 हजार निदर्शक एकत्र आले होते. त्यांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या तसेच अंडय़ांचा मारा केला. मॉस्कोमध्ये 39 अधिकारी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मागील आठवडय़ातच मायदेशी
अलेक्सी 5 महिन्यांपूर्वी उपचारासाठी जर्मनीत गेले होते. एका विमानप्रवासादरम्यान त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. अलेक्सी यांच्या शरीरात मिळालेले विष रशियन सैन्याने सोव्हिएत संघाच्या कालखंडात विकसित केले होते. हा विषप्रयोग पुतीन यांनी घडवून आणल्याचा आरोप झाला होता. परंतु रशियाच्या सरकारने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मागील आठवडय़ातच जर्मनीतून परतलेल्या नवाल्नी यांना तुरुंगात डांबण्यात आले होते.
भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे चेहरे
पुतीन यांच्याविरोधात उघडपणे टीका करण्यात अलेक्सी आघाडीवर आहेत. भ्रष्टाचार विरोधातील मोहिमेसाठी त्यांना ओळखले जाते. त्यांनी 2018 मध्ये पुतीन यांच्या विरोधात राष्ट्रपती निवडणूक लढविण्यासाठी अर्जही केला होता. परंतु कथित फसवणुकीच्या प्रकरणामुळे त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यात आला होता.