बेळगाव : सहकार, शिक्षण, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले कै. गजाननराव भातकांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 10 डिसेंबर रोजी एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता कार्यक्रम होणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष कलर लॅबचे सुभाष ओऊळकर व शाळेच्या समन्वयिका दया शहापूरकर तसेच संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे उपस्थित राहणार आहेत. 103 व्या जन्मदिनानिमित्त संस्थेच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांचे कार्य मोठे होते.
राजकीय क्षेत्रात प्रवेश करत गजाननराव भातकांडे यांनी जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढविली. सतत 34 वर्षे नगरसेवक तर 3 वेळा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला. सहकारी बँकेत कारकुनाची नोकरी करताना मराठा बँकेची स्थापना करत 12 वर्षे चेअरमनपद भूषविले. बेळगाव पायोनियर तसेच बेळगाव जिल्हा केंद्र सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य पाहिले.
विविध संस्थांतील सहभाग ही त्यांची सामाजिक कार्यातील तळमळ होती. याशिवाय क्रीडा क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रातदेखील त्यांचे कार्य मोठे आहे. भातकांडे हायस्कूलद्वारा संचालित केंब्रिज इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक होते.