रायगडपासून सुरुवात : सॅटेलाईट ड्रोनच्या साहाय्याने होणार लॅडर तंत्राचा वापर
सुधाकर काशीद / कोल्हापूर
इतिहासाचे साक्षीदार असलेल्या व कोणतीही आधुनिक साधने नसतानाच्या काळात आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या गडकिल्ल्याच्या मोजमापासाठी आता लॅडर तंत्राचा वापर होणार आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर त्याची सुरुवात होत आहे. किल्ल्याचा विस्तार, भिंती, तटबंदी, अस्तित्व टिकून राहिलेल्या वास्तू, त्याचे दगड याचे तंत्रशुद्ध मोजमाप या तंत्राने करता येणार आहे. त्याकाळात कुशल तंत्रावर, जिद्दीवर, आणि ताकदीवर बांधलेल्या या किल्ल्यांचे मोजमाप आजही सहज करणे अशक्य आहे. त्यामुळे तंत्राचा आधार घेतला जाणार आहे. सॅटेलाइट ड्रोनच्या साहाय्याने हे तंत्र वापरले जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील पन्हाळा, विशाळगड, रांगणा, वैभवगड, शिवगड तसेच सिंधुदुर्ग किल्ला यांच्या जतन व संवर्धनासाठी हे तंत्र वापरता येणे शक्य आहे. उच्च रिझोल्युशनचे नकाशे तयार करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. (लाईट डिटेक्शन, रॅगिंग रिमोट सेन्सिंग) या तंत्राने अचूक मोजमाप करता येते एवढेच नव्हे तर तटबंदीचा एखादा दगडही किती लांबी-रुंदीचा आहे हे समजू शकते. त्यामुळे जतन व संवर्धनाच्या कामात खूप मोठी तांत्रिक सुलभता येणार आहे. गड व किल्ला हा मुख्य भाग असला तरीही गडाच्या घेऱयात परिसरात येणाऱया छोटय़ा छोटय़ा वाडय़ा-वस्त्या, छोटी छोटी गावे याला देखील खूप महत्त्व असते. किंबहुना गडाचे अस्तित्व त्याच्या घेऱयातील वाडय़ा-वस्त्यामुळेच जिवंत असते.
अशा 7 वाडय़ावस्त्यांचा सर्व्हेही इस्त्राsच्या साहाय्याने केला जाणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर विभागाने रायगडच्या पायथ्याच्या आजूबाजूला असलेल्या 21 गावांचे सर्वेक्षण या तंत्राने पूर्णही केले आहे.
या गावांना मिळणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्राsतही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यावर अधिक काम करता येणार आहे. रिमोट सेन्सिंग ऍप्लीकेशनमुळे रायगडावर या ना त्या करण्यासाठी बांधकाम केलेल्या जागांचा बऱयापैकी अंदाज आला आहे. अनेक ठिकाणी जोते (बांधकामाच्या सुरुवातीचा टप्पा) निदर्शनास आले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी सर्वच वाडे होते असे नसले तरीही त्या ठिकाणी काही ना काही त्याकाळी बांधकाम होते हे स्पष्ट होऊ शकले आहे. जतन व संवर्धनाच्या पुढील टप्प्यात त्याचे नेमकेपण हळूहळू उलगडत जाणार आहे. पुढच्या अभ्यासासाठी आणखी उपयोगी पडणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हे सारे काम सुरू आहे. पुरातत्व विभाग रायगड प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष स्थापत्य पथक यासाठी कार्यरत आहे.