वार्ताहर/ ताम्हाने
देशातील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वच भीतीच्या छायेखाली जगत आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पोलीस, आरोग्य व अन्य प्रशासकीय यंत्रणा आपल्या जीवाची परवा न करता युद्धपातळीवर मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करणारा देखावा संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील दीपक बाबी लिंगायत यांच्या घरी यावर्षी गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे.
दीपक लिंगायत यांच्या घरी गणेशोत्सव अनंत चतुर्थीपर्यंत साजरा केला जातो. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई, राज, भाग्येश, श्रेयश आणि विनायक या बंधूंनी जनजागृती करणारा देखावा साकारला आहे. कोरोनाच्या महासंकटातून गणपती बाप्पा तारेल, अशी श्रद्धा बाळगून कोरोना योध्दय़ांना प्रोत्साहन देणारे चित्र यातून साकारण्यात आले आहे. हा देखावा साकारण्यासाठी नारळाच्या झावळा, केळीचे सोफ, बांबू, गोणपाट व कागद आदी सहज उपलब्ध होणाऱया साहित्यांचा वापर केला आहे.
कोरोनासारखे महासंकट रोखण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणेसह वैयक्तिक पातळीवरही अनेकजण विशेष मेहनत घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर परचुरी येथील या बंधूंनी सर्वांच्या मनात असलेली कोरोनाची भीती दूर करण्यासाठी आपल्या घरगुती गणेशोत्सवात आगळावेगळा असा देखावा साकारला आहे. या देखाव्यातून त्यांनी कोरोना योध्दय़ांच्या कार्याचे कौतुक करत या संकटातून गणपती बाप्पा आपली लवकरच सुटका करेल, असा संदेश देत अनेकांची भीती दूर केली आहे. परचुरीतील या बंधुनी केलेली ही जागृती कौतुकास पात्र ठरणारी अशीच आहे.
.