परिवहनचा अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय, विविध मार्गांचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहन मंडळाने गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बससेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयी खातर बसस्थानकातून जादा 50 बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत.
परिवहनला कोरोनामुळे मागील दोन वर्षात प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे परिवहन विविध मार्गांवर बससेवा सुरळीत सुरू करून महसूल वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. गणेशोत्सव काळात देखील परिवहनकडून जिल्हांतर्गत बससेवेबरोबर गोवा राज्यात देखील अतिरिक्त बस धावणार आहेत. बेंगळूर, म्हैसूर, दावणगिरी, गदग, हावेरी, चिकोडी, बागलकोट यासह गोवा राज्यात जादा बस सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव काळासाठी विविध भागातून गावाकडे येणाऱयांची संख्या अधिक असते. जिल्हय़ातील अनेकजण कामासाठी गोवा राज्यात असतात. ते सणासाठी गावी परतत असतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढलेली असते. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन परिवहनने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी गणेशचतुर्थी, शनिवारी दुसरा शनिवार तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने शासकीय नोकरदारांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे अनेकजण सणासाठी बाहेर जाणारे असतात.
कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेवर परिणाम
राज्यात बससेवा सुरळीत सुरू असली तरी कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या महसुलावर देखील परिणाम झाला आहे. लांब पल्ल्यासाठी देखील विविध मार्गांवर अतिरिक्त बस धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.