डॉ.केतन भाटीकर यांचा उपक्रम
प्रतिनिधी/ फोंडा
रायझिंग फोंडातर्फे डॉ. केतन भाटीकर यांच्या पुढाकारने फोंडय़ात सुरु केलेल्या ‘फूड बँक’चे उद्घाटन मगो नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना नियमित अन्न पुरवठा केला जाणार आहे.
खाद्यपदार्थ ठेवण्याच्या रेफ्रिजीरेटरचे सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते फित कापून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. अन्नदान हे सर्वात मोठे पूण्यकर्म असून डॉ. भाटीकर यांनी सुरु केलेला हा उपक्रम खऱया अर्थाने समाजासाठी गरजेचा आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरजू लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगून फोंडा तालुक्यात यापुढे चार ठिकाणी असा उपक्रम सुरु करण्याचा मनोदय सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला.
फोंडय़ातील पहिली फूड बँक : डॉ. भाटीकर
‘फूड बँक’ हा फोंडय़ातील पहिला उपक्रम असल्याचे डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले. एका बाजूला लग्न, वाढदिवस किंवा अन्य पाटर्य़ातून शिल्लक राहणारे जेवण वाया जाते, तर दुसरीकडे पोटभर जेवण न मिळणारे लोकही आहेत. अशा गरजू लोकांची दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली. सकाळी 9 ते रात्री 8 वाजे. पर्यंत तिस्क फोंडा येथील मगो कार्यालयात गरीबांसाठी ही सेवा सुरु राहणार आहे. फोंडा परिसरात होणारे लग्न सोहळ, वाढदिवस किंवा अन्य पाटर्य़ातून अन्नाचा थोडासा वाटा या फूड बँकसाठी बाजूला ठेवावा. तसेच हॉटेल्स व इतर आस्थापनांनी खाद्यपदार्थ किंवा फळे दान करण्याचे आवाहन डॉ. भाटीकर यांनी केले.
पहिल्याच दिवशी साधारण 300 हून अधिक नागरिकांकडून या उपक्रमासाठी विविध खाद्यपदार्थ पुरविण्यात आले. कार्यक्रमाला फोंडा पालिकेचे नगरसेवक व्यंकटेश नाईक, गिताली तळावलीकर, अमिना नाईक तसेच मगो पक्षाचे अभय प्रभू, मोहन वेरेकर, सुमित वेरेकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, कुर्टीचे उपसरपंच सुधीर राऊत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.