रेणुकानगर परिसरातील घटनेने खळबळ : 25 ते 30 वषीय तरुण जळून खाक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात गूढ खुनांच्या मालिका सुरूच आहेत. बेळगुंदी येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा लागत असतानाच रेणुकानगर परिसरात आणखी एक खळबळजनक खुनाचा उलगडा झाला आहे. गवतगंजीत घालून एका अज्ञाताला जाळण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. माळमारुती पोलिसांनी सुमारे 25 ते 30 वषीय अज्ञात तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला आहे.
यासंबंधी यल्लाप्पा फकिराप्पा बुडग (रा. वंटमुरी कॉलनी) यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 302, 201 कलमान्वये खून करून पुरावे नष्ट केल्यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि. 1 मार्चच्या रात्री 9 ते बुधवार दि. 2 मार्च सकाळी 9.30 यावेळेत ही घटना घडली आहे. गवतगंजीत घालून अज्ञात तरुणाला पेटविण्यात आले असून त्याच्या संपूर्ण शरीराचा कोळसा झाला आहे. चेहरा जळाल्याने ओळख पटविणे कठीण होत आहे. त्या तरुणाच्या अंगावरील कपडेही जळाले आहेत. टी-शर्ट आणि टॉवेलचे तुकडे पोलिसांना आढळून आले आहेत. कंबरेला घातलेला बेल्टही पूर्णपणे जळाला असून त्याचे बकल आणि उजव्या हातात घातलेली अंगठी घटनास्थळी सापडली आहे. 5 फूट 2 इंच त्याची उंची आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.