वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ज्या डब्यातून दाखविलेला हिरवा झेंडा दिसल्याशिवाय रेल्वेगाडय़ा सुरू होत नव्हत्या, त्या गार्डाच्या डब्याला आता रेल्वेविभाग लवकरच ‘लाल झेंडा’ दाखवणार आहे. अर्थात, गार्डाचा डबा आता इतिहासजमा होणार आहे. यामुळे साऱयांनाच, विशेषतः या डब्याचे आकर्षण असणाऱया लहान मुलांना चुटपुट लागणार असली तरी सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अशी परिवर्तने अपरिहार्य आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी मालगाडय़ांपासून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास प्रवासी रेल्वेंमधूनही गार्ड वॅन हटवून तेथे नव्या तंत्रज्ञानाचे यंत्र जोडण्यात येणार आहे.
गार्डचा डबा हा भारतीय रेल्वेची जुनी ओळख आहे. इंग्रजांच्या काळापासूनच चालत आलेल्या या व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची मोठी तयारी आहे. रेल्वे आता गार्डचा कोच हटवून तेथे विशेष प्रकारची यंत्रे बसविणार आहे. हे यंत्र रेल्वेच्या अंतिम डब्यात जोडण्यात येणार असून ते सिग्नलद्वारे लोको पायलटला सर्व महत्त्वाची माहिती पुरविणार आहे. हे काम आतापर्यंत रेल्वेच्या अंतिम डब्यात सेवा बजावणाऱया गार्डकडे होते. गार्डकडून हिरवा झेंडा दाखविण्यात आल्यावरच रेल्वे प्लॅटफॉर्मवरून रवाना होते.
सोमवारी अशा 5 यंत्रणांची चाचणी ईस्ट कोस्ट रेल्वेंमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रे अमेरिकेतून मागविण्यात आली आहेत. शनिवारीही अशाप्रकारचे एक यंत्र रेल्वेत जोडून त्याचे परीक्षण करण्यात आले. हे परीक्षण तलचर ते पारादीप या मार्गावर करण्यात आले आहे. यादरम्यान यंत्राने सर्व माहिती योग्यवेळी लोको पायलटपर्यंत पोहोचविली आणि आता परीक्षणाची व्याप्तीही वाढविण्यात येत आहे. याला ईओटीटी (एंड ऑफ ट्रेन टेलिमेट्री) ट्रायलचे नाव देण्यात आले आहे. सामान्य भाषेत हे यंत्र रेल्वेचा अंतिम डबा आणि इंजिनादरम्यान संपर्काचे काम करते.
रेल्वेच्या वाराणसी लोकोमोटिव वर्क्सने अशा 250 यंत्रांची ऑर्डर दक्षिण आफ्रिकेच्या एका कंपनीला दिली आहे. या प्रकल्पाला रेल्वेकडून यापूर्वीच हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. 100 कोटींचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वेला अनेक पातळय़ांवर लाभ होणार आहे. सर्वप्रथम दरवेळी रेल्वे रवाना होण्यापूर्वी गार्डला देण्यात येणाऱया फिटनेस प्रमाणपत्राची परंपरा बंद होणार आहे.