प्रतिनिधी / सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील १२७ फेरीवाल्यांनी परवाना आणि ओळखपत्र मिळणेसाठी कागदपत्रांसह अर्ज मनपाकडे जमा केले आहेत. फेरीवाल्यांना सुलभतेने सेवा मिळावी यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत परवाना आणि ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे. यासाठी आजअखेर ५५४ फेरीवाल्यांनी प्रमाणपत्र आणि ओळ्खपत्रासाठी अर्ज नेले आहेत. यापैकी १२७ फेरीवाल्यांनी आपले अर्ज कागदपत्रांची पूर्तता करीत मनपाकडे जमा केले आहेत. यासाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती सर्वदे, मतीन अमीन, राजेंद्र हंकारे समूह संघटिका वंदना सव्वाखंडे, संपदा मोरे आदींची टीम कार्यरत आहे तर या टीमला फेरीवाला समिती सदस्य रेखा पाटील, सुरेश टेंगले यांनीही सहकार्य केले आहे. फेरीवाल्यांनी २२ डिसेंबरपूर्वी आपले अर्ज मनपाकडे जमा करावेत जेणेकरून २२ डिसेंबरपासून जमा फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यास सुरुवात केली जाईल असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.