निलेश गायकवाड/ खंडाळा
डॉ. कलाम यांचे जन्मगाव असणाऱया रामेश्वरम येथे हाफिज पटेल याने प्रत्यक्ष तर अर्थव नेवसे याने लिंकव्दारे सहभाग नोंदवत अवकाशाला गवसणी घातली आहे. या विद्यार्थ्यांसह देशातील 100 विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शंभर उपग्रहाचे एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जगातला सर्वात कमी वजनाचा (25 ते 80 ग्रॅम) उपग्रह सोडल्याने हा विश्वविक्रम, आशिया, इंडिया व 65 देशांचा असिस्ट विक्रम नोंदवला गेला. दरम्यान, गिनीजवर्ल्ड रेकॉर्डसाठी नुकतीच हाफिज पटेल, अर्थव नेवसे यांची निवड झाली आहे. त्यामुळे खंडाळ्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्युब्ज चॅलेंज 2021 अंतर्गत, कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिंन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवलेल्या प्रकल्पामध्ये रामेश्वरम (तामिळनाडू) येथून 7 फेब्रुवारी रोजी शंभर उपग्रहाचे एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणामध्ये खंडाळ्य़ातील राजेंद्र विद्यालयाच्या हाफिज अशपाक पटेल याने प्रत्यक्ष रामेश्वरम येथे आपला सहभाग नोंदवला. तर अर्थव नेवसे (ज्ञानसंवर्धिनी शिरवळ) याने विश्वविक्रमात सहभाग नोंदवल्यामुळे खंडाळ्या बरोबर जिह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्यांची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाऊस ऑफ कलामला पत्र पाठवुन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
या प्रक्षेपणावेळी डी.आर.डी.ओ व इस्त्राsचे शास्त्रज्ञ, ब्राम्हो क्षेपणास्त्राचे एमडी डॉ. ए. शिवनाथु पिल्ले, नासाचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर व स्पेस झोन इंडियाचे सीईओ डॉ. आनंद मिलिगम, राजन्स टी. व्ही. टॉवरचे डॉ. जोसेफ राजन, एमजीआरचे डॉ. आय. रमेश, मार्टिन ग्रुपचे डॉ. लिना रोज, डॉ. कलाम यांचे पणतू एपीजेएम शेख सलीम, एपीजेएम शेख दाऊद, प्रकल्पाचे राज्य समन्वयक मनिषा चौधरी, सचिव मिलींद चौधरी व प्रशिक्षक मोहन चौधरी व बालवैज्ञानिक उपस्थित होते. तसेच तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलसाई सौंदराजन व भारतीय अवकाश संशोधनचे प्रोफेसर वाय. एस. राजन यांनी व्हिडिओ कॉलव्दारे शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या 100 उपग्रहापैकी 39 उपग्रह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. प्रक्षेपणापूर्वी भारतीय ध्वजाला मानवंदना देत राज्य समन्वयक मनिषा चौधरी व जनरल सेक्रेटरी मिलींद चौधरी यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांसह प्रक्षेपण तळापर्यंत तिरंगा मार्च काढण्यात आला. जागतिक विक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठे कौतुक केले.