अन्य चार संशयितांची सुटका; मिंच्याचा खून करून तो मृतदेह जाळून टाकला होता;
प्रतिनिधी / सांगली
गुंड मिंच्या उर्फ मिलींद गवळी रा. गवळी गल्ली, सांगली याचा खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी राहुल लक्ष्मण भोसले (वय 34, रा. सांगलीवाडी, सांगली) याला चार वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच तीन हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न दिल्यास आणखीन सहा महिने कारवास अशी शिक्षा अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांनी सुनावली. तर अन्य चार संशयितांना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हा सरकारी वकिल उल्हास चिप्रे यांनी सुरुवातीचे खटल्याचे काम चालविले. त्यानंतर सहा जिल्हा सरकारी वकिल मकरंद ग्रामोपाध्ये यांनी अंतिम युक्तीवाद पुर्ण करुन सरकार पक्षातर्फे काम पाहिले होते.
याबाबत हकीकत अशी की, यातील आरोपी राहुल लक्ष्मण भोसले व इतर संशयित सिध्दार्थ सुखदेव चिपरीकर, भागवत मधुकर पाटील, संजय आणाप्पा होसमाने, अतुल उर्फ बाबू संजय पाटील (सर्व रा. सांगलीवाडी) यांनी मिंच्या उर्फ मिलिंद गवळी याचा जमिनीच्या व्यवहारातून पैसे देण्या-घेण्यावरुन व अन्य कारणावरुन खून करण्याचा कट रचला, चार सप्टेंबर 2016 रोजी संशयित भागवत पाटील वापरत असलेल्या स्विफ्ट गाडीमधून मिंच्याला घेवून जावून, डायव्हर सीटच्या मागे बसून मिंच्या यास पाठीमागील बाजूस फायर करुन त्याचा खून केला. त्यानंतर हा मृतदेह कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखान्याकडे घेवून जावून त्याठिकाणी अगोदरच रचून ठेवलेल्या चितेवर डिझेल ओतून पेटवून दिले व दुस-या दिवशी त्याची हाडे व राख पोत्यात भरुन ती कृष्णा नदीच्या नवीन बायपास पुलावरुन नदीत टाकून दिली. तसेच मिंच्याचे दोन्ही मोबाईल हॅन्डसेट नदीत टाकून दिले. तसेच सदर आरोपींनी गुन्हा करतेवेळी घातलेले कपडे अन्य ठिकाणी जाळून नष्ट केले होते. या गुन्हयाचा तपास सुरुवातीस सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी केला. त्यानंतर सदरचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण यांच्याकडे वर्ग झाला. तपासाअंती सर्व पुरावे तसेच तज्ञांचे मत यावरुन आरोपपत्र दाखल केले. सदर सेशन केसची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांचे न्यायालयात सुरु होती. याकामी सरकार पक्षातर्फे 20 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, मिंच्याचा भाऊ, तसेच त्याचा मित्र स्वप्निल नलवडे व प्रताप किसन पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली.
या आरोपी आणि संशयितांनी आपण हा खून कसा केला आहे. हे सांगून त्याप्रमाणे जागा व वस्तु दाखविल्या होत्या. त्याचे जप्ती पंचनामे तसेच सदर आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी गोळया मारण्याचा सराव केला होता. त्या झाडांचे पंचनामे व जप्त केलेला मुद्देमाल तसेच गोळया, पिस्तुल वगैरे सर्व पंचनामे न्यायालयासमोर सरकारी पंचनामाच्या जबाबातून सादर केले होते. हे सर्व पुरावे विचारात घेवून न्यायालयाने सदर गुन्हयामध्ये आरोपींनी गुन्हा करुन पुरावा नष्ट केल्याचे सिध्द झाले. आरोपी राहुल भोसले याला याप्रकरणी दोषी धरून त्याला चार वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणांचा तपास निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, उपनिरीक्षक युवराज कामटे, सहा. उपनिरीक्षक सागर पाटील व हवालदार संदिप मोरे यांनी तपास केला.