पाकिस्तानातून मागवले होते 120 किलो ड्रग्जः युएईमध्ये ड्रग्ज तस्करीचा कट शिजल्याचे स्पष्ट
सुरत / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये पुन्हा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुरत जिल्हय़ातील जिंजुडा गावातून 120 किलो ड्रग्ज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. गुजरातमधील ऍक्शन टास्क फोर्सने (एटीएस) याप्रकरणी शमसुद्दीन सय्यद, जब्बार मुख्तार हुसेन आणि गुलाम हुसैन अशा तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. जब्बार आणि गुलाम हे या भागातील ड्रग्ज तस्करीतील माहितगार आहेत. त्यांना यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.
जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ पाकिस्तानातून सागरी मार्गाने द्वारका येथे नेण्यात आले होते. त्यानंतर ते जिंजुडा गावातील एका घरात लपवून ठेवण्यात आले. पाकिस्तानी तस्करांनी ऑक्टोबरमध्ये मालाचा पुरवठा केला होता. द्वारका येथून ते आफ्रिकन देशांमध्ये पाठवले जाणार होते, अशी माहिती राज्याचे पोलीस प्रमुख आशिष भाटिया यांनी दिली. ही ड्रग डिलिव्हरीची योजना यूएईमधील तस्करांनी तयार केली होती, अशी माहितीही आरोपींच्या चौकशीतून पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी द्वारका येथूनच 60 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
आफ्रिकन देशांमध्ये निर्यातीचा डाव उधळला
भारतीय नौदलाने हाय अलर्ट जारी केल्यामुळे आयात करण्यात आलेले अमली पदार्थ द्वारका येथेच उतरवण्यात आले. यासाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेण्यात आली. नंतर ते सिमेंटच्या गोण्यांमध्ये भरून लपवून ठेवण्यात आले होते. याचदरम्यान एटीएसला याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली. तटरक्षक दल आणि नौदल सतर्क असल्याने हा साठा आफ्रिकेत पाठवण्याचा कट उधळला गेला.
केंद्रीय यंत्रणांना दिली माहिती
केंद्रीय यंत्रणांना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. तसेच 3 सप्टेंबर रोजी कच्छमधील मुंद्रा बंदरातून 21 हजार कोटी रुपयांचे 2,988 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हा साठा टॅल्कम पावडरच्या स्वरूपात दोन कंटेनरमधून इराण, अफगाणिस्तानमार्गे मुंद्रा बंदरात पोहोचला होता. याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे.