प्रतिनिधी /बेळगाव
ऍस्ट्रोटर्फ ग्राउंड, कच्छ, गुजरात येथे 24 डिसेंबरपर्यंत होणाऱया गुजरात राज्य महिला फुटबॉल लीग स्पर्धेसाठी बेळगावच्या महिला फुटबॉलपटूंची निवड झाली आहे.
बेळगावमधील 6 मुलींची निवड एआरए एफसी अहमदाबाद, गुजरात यांनी गुजरात स्टेट वुमन्स फुटबॉल लीगसाठी केली आहे. एआरए एफसी अहमदाबाद, हा गुजरात स्थित पहिला व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. या क्लबने मानस स्पोर्ट्स अकादमीच्या धनश्री कदम, सायली देसाई, तन्वी गावडे, तेजश्री पाटील, पल्लवी चौगुले, वैष्णवी पाटील यांची निवड केली आहे. उत्तर कर्नाटकामधून पहिल्यांदाच बेळगांव मधील मुलींची एआरए एफसीतर्फे खेळण्यासाठी निवड झाली असून गेले तीन आठवडे त्यांना एआरए एफसी टर्फ ग्राउंड, अहमदाबाद, गुजरात राज्य महिला फुटबॉल लीग आणि इंडियन महिला लीगसाठी प्रशिक्षक विवेक नागुल यांच्याकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
विवेक नागुल हे युइएफए लायसन्स आणि एआयएफएफ ’ए’ प्रशिक्षक आहेत. चेन्नईयन एफसी संघाने आयएसएल चषक जिंकला, त्यावेळी ते संघाचे प्रशिक्षक होते. बेळगावच्या या मुलींना प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या मुली मराठी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांना शालेय जीवनात महेश हगीदळे यांनी प्राथमिक प्रशिक्षण दिले. सध्या या मुली लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयात शिकत असून त्यांना लिंगराजचे क्रीडा प्राध्यापक रामाराव आणि प्रा. गिरीजा हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.