चेअरमन प्रदीप अष्टेकर यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
येथील पायोनिअर अर्बन को-ऑप. बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 95 लाख 84 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे 94 कोटी 14 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वत्र घडी विस्कटली असली तरी बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे, अशी माहिती पायोनिअर अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी बोलताना दिली. बँकेची 115 वी वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने शनिवारी संपन्न झाली.
प्रारंभी गेल्या वर्षी झालेल्या 114 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मूल्या यांनी वाचून दाखविल्यानंतर ते कायम करण्यात आले. त्यानंतर 2020-21 सालचा अहवाल, नफा-तोटा, ताळेबंद पत्रक यांचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. ऑडिट रिपोर्ट आणि बँकेने तयार केलेला दुरुस्ती रिपोर्ट यांचे वाचन करून परिशिलन करण्यात आले. नवीन वर्षासाठी ऑडिटरची नेमणूक, मागील सालाच्या अंदाजपत्रकास मंजुरी व बजेटपेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देऊन आगामी सालाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. निव्वळ नफा याची विभागणी आणि राखीव निधी व इतर निधी बाबतही बैठकीत मंजुरी देण्यात आली. बँकेने नवीन केलेले सभासद व कमी झालेले सभासद यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या जुन्या कर्जांचे एकवेळी निकालात काढणेबाबत (वन टाईम सेटलमेंट) चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
गेल्या आर्थिक वर्षाच्या उलाढालीबाबत माहिती देताना चेअरमन अष्टेकर यांनी सांगितले की, बँकेचे भागभांडवल 2 कोटी 9 लाख 8 हजार झाले असून राखीव निधी 16 कोटी 27 लाख 9 हजार, ठेवी 94 कोटी 14 लाख, कर्जे 66 कोटी 99 लाख, गुंतवणूक 40 कोटी 46 लाख, खेळते भांडवल 114 कोटी 38 लाख असून ढोबळ नफा 1 कोटी 32 लाख 84 हजार रुपये तर निव्वळ नफा 95 लाख 84 हजार रुपये झाला आहे. बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर, गोवावेस आणि मार्केट यार्ड शाखा व्यवस्थित कार्य करीत असून लवकरच आणखी काही शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सभेत अनेक सभासदांनी भाग घेतला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमनची उत्तरे दिली. व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण -पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, रवी दोड्डन्नवर, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर, सुहास तरळे, गजानन ठोकणेकर व विद्याधर कुरणे आदी संचालक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वांनी भाग घेतला आणि सभा खेळीमेळीत पार पडली.