हरीत लवादाच्या आदेशानुसार प्रक्रिया, दापोली पतन उपविभागाची कारवाई सुरू
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर समुद्रकिनारी सुमारे 96 लाख खर्चून उभारण्यात आलेल्या सॉलीड जेटीवर सोमवारी अखेर हातोडा पडला. किनाऱयावरील सी व्हय़ू गॅलरी हटवण्यात आल्यानंतर महिन्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आलेली ही जेटी काढून टाकण्याचे काम दापोली पतन उपविभागाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.
पतन अभियंता रत्नागिरी विभाग पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत बारावा वित्त आयोग सागरी किनारी व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने ही जेटी उभारली होती.
आमदार जाधव यांनी मंत्री असताना गुहागर समुद्रकिनाऱयावर इको टुरिझमच्या माध्यमातून समुद्राचे जवळून दर्शन व्हावे व पर्यटनाला चालना मिळाली यासाठी ही सॉलीड जेटी उभारली होती. 2014मध्ये या जेटीचा शुभारंभ झाला मात्र त्याचवर्षी 12 जूनच्या उधाणाच्या लाटांच्या तडाख्यांनी जेटीला तडे गेले होते. जेटीवरील रेलिंग, सोलर दिवे, बाकडी उडाली होती. यामुळे या जेटीच्या कामाबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या.
जून 2014 मध्ये भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी अनधिकृतपणे बांधलेल्या या जेटीबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुहागर शहरातील बळवंत परचुरे यांनी ही जेटी सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आली असून समुद्रीजीवाना धोकादायक असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. गेली दोन वर्षे या दाव्याची सुनावणी सुरू होती. जेटीच्या संरक्षणासाठी आणखी कोटय़वधीचा निधी मंजूर होत असताना हा विषय आणखीनच पेटला होता.
सुनावणीअंती हरित लवादाने ही जेटी सीआरझेडची परवानगी न घेता बांधण्यात आली असून ती काढून टाकण्यात यावी असा निकाल दिला होता. यापूर्वी ऑगस्टमध्येच सी व्हयू गॅलरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांनी काढून टाकली आहे. हरित लवादाच्या निकालानुसार जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे जेटी काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती दापोली पतन उपविभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण तनपुरे यांनी ‘तरूण भारत’ला दिली.
जेटी उभारणाऱया ठेकेदाराकडूनच काढण्याचे काम
सोमवारपासून जेटी काढण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू होते. ज्या ठेकेदाराने जेटी उभारण्याचे काम केले त्याच ठेकेदाराच्या जेसीबीने जेटी काढून टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. जेसीबीने जेटी काढणे शक्य नसल्याने ब्रेकरच्या सहाय्याने ही जेटी तोडली जाणार आहे. यामुळे जेटी काढून टाकण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जेटी काढण्याच्या कामासाठी करणार निविदा प्रक्रिया दापोली पतन उपविभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण तनपुरे, कनिष्ठ अभियंता अमोल कांबळे, राकेश जाधव यांच्या उपस्थितीत जेटी काढण्याचे काम सुरू आहे. हरित लवादाने दिलेल्या निकालामध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या या जेटीचे काढून टाकण्याचा सर्व खर्च संबंधितांनी करावयाचा आहे. त्याचबरोबर जेटी उभारण्यावर आलेला सुमारे 96 लाख खर्चही संबंधितांकडून वसूल करावयाचा आहे. जेटी काढण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पतन विभागाच्या उपस्थित अभियंत्यांनी दिली. काढलेल्या जेटीचे काँक्रीट हे शासकीय जागेत जमा केले जाणार आहे. त्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे शासकीय जागेची मागणी करण्यात आली आहे.