प्रतिनिधी / सातारा :
शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या चौकात असणाऱ्या एका चहाच्या टपरीला मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ ही आग आटोक्यात आणल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथील सदरबझार परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. याठिकाणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक वाहनांसंबंधी कामासाठी रोज येत असतात. कार्यालयाच्या बाहेर जिल्हा रुग्णालय मार्गाच्या कडेला नागरिकांसाठी चहा, नाश्त्याची सुविधा असणाऱ्या अनेक टपऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी दुपारी यापैकी एका टपरीत घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. यामुळे आगीचे डोंब उठले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारील इमारतीत असणाऱ्या पोर्टेबल फायर डीस्टिंगविशर आणून आग विझविण्याचे प्रयत्न केला. तो पर्यंत सातारा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण टपरी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.