म्हैस 2 तर गायीच्या दुधास 1 रुपये वाढ; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरासह विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दूध दोन रुपये तर गाय दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. गोकुळचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निर्णयामुळे जिह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. याचबरोबर पुणे आणि मुंबई येथील विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला विक्री दरवाढीतून वगळण्यात आले आहे. सोमवार 11 पासून नवे दर लागू होतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, या दरवाढीमुळे गोकुळवर वर्षाला 71 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र मुंबई आणि पुण्यातील विक्रीतील दरवाढीमुळे 69 कोटी रुपये गोकुळच्या तिजोरीत जमा होणार आहेत. तरीही दोन कोटीचा राहिलेला फरक भविष्यात भरून काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोकुळ निवडणुकीच्या काळात प्रचारा दरम्यान दूध उत्पादक शेतकर्यांना दोन रुपये जादा दर देऊ, असे आश्वासन दिले होते. याची पूर्तता करण्यासाठी गेली 40 ते 45 दिवस आढवा घेतला जात होता. संचालक मंडळाच्या बैठका घेऊन मार्ग शोधणे सुरु होते. आढावा घेत असताना अनेक गंभीर तृटी समोर आल्या. अतिरिक्त कर्मचारी कमी केले. रोजंदारीवरील कर्मचारी भरती बंद केली. स्वच्छतेचा ठेका रद्द करुन गोकुळच्या आहे त्या कर्मचार्यांकडून पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या. वाहतुक खर्चात कपातीचा मोठा निर्णय घेतला. या माध्यमातून वर्षाला 10 ते 12 कोटी रुपये बचत होणार आहे. पशुखाद्याच्या बाबतीतही लवकरच धोरण ठरवण्यात येणार आहे. भविष्यात गोकुळ आणि दूध उत्पादक शेतकर्यांची प्रगती हेच ध्येय ठेऊन वाटचाल असणार आहे.
मुंबई पुण्यात विक्री दरात दोन रुपयांनी वाढ
अमुल आणि इतर संघानी विक्री दरात वाढ केल्याने गोकुळ ही मुंबई आणि पुणे येथे विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये दोन रुपये प्रमाणे वाढ करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, विक्री आणि खरेदी दरवाढीमुळे अतिरिक्त दोन कोटी रुपये शेतकर्यांना द्यावे लागणार आहेत. त्याचे नियोजन आगामी काळात आम्ही विविध मार्गाने बचत करून करणार आहोत. निवडणूक प्रचारा दरम्यान वासाचे दूध, खरेदी दरवाढ आणि पशुखाद्य दरावर दूध संस्था प्रतिनिधीने तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल आम्ही घेतली. संचालक मंडळ आणि आम्ही एकत्र बसून कशा पद्धतीने हे दुरुस्त करता येईल, यावर अभ्यास केला आणि केवळ महीना दिड महिन्यात अनेक धाडसी निर्णय घेऊन निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचे मला समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लवकरच सुगंधी दूध- चेअरमन विश्वास पाटील
चेअरमन विश्वास पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करीत महिन्याभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, म्हैस दूध वाढीसाठी जिल्हा बेक मदत करणार आहे. मुंबई येथे पॅकिंगसाठी राज्य सरकारकडून जागा मिळणार आहे. भविष्यात पेट्रोल पंप सुरु करण्यात येणार आहे. संघाकडून दोन प्रकारात सुगंधी दूध स्ट्रॉबेरी, चॉकलेटच्या स्वादात आणणार आहे. यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांचा प्लॅट मिळणार आहे. त्याचबरोबर टेट्रा पॅकमध्ये ताकही उपलब्ध होणार आहे.
पत्रकार परिषदेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.
असे आहेत सुधारीत दर म्हैस दूध दर रुपयात एसएनकएफ जुना दर नविन दर 6.0-9.0 39.50 41.50 7.0-9.0 44.00 46.00 8.0-9.0 47.00 49.00 9.0-9.0 50.00 52.00 10.0 53.00 55.00 गाय म्हैस दूध दर रुपयात एसएनकएफ जुना दर नविन दर 3.5-8.5 26.00 27.00 4.0-8.5 27.50 28.50 4.5-8.5 29.00 30.00 5.0-8.5 30.50 31.50 असे आहेत सुधारीत दूध विक्री दर मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पिंपरी, बारामती, फलटण, अहमदनगर। औरंगाबाद म्हैस - 60 रुपये गाय - 46 रुपये अशी होणार बचत वार्षिक जनावरील औषधोउपचार - 48 लाख गोचिड ताप निर्मुलन - 7 लाख 26 हजार पशुखाद्य वाहतुक - 2 कोटी दूध संकलन - 1 कोटी टँकर वाहतुक - 5 कोटी 32 लाख मुंबई दूध पॅकिंग - 1 कोटी 19 लाख रोजंदारी कर्मचारी - 3 कोटी 12 लाख स्वच्छात ठेका - 7 कोटी 95 लाख