प्रतिनिधी / सांगली
पुणे – मिरज – लोंढा या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेतील रेल्वेच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम गतीने सुरू असून या मार्गावरील ताकारी ते किर्लोस्करवाडी या साडेपाच किलोमीटर मार्गावरील दुहेरीकरण झालेल्या मार्गावरून शुक्रवारी पहिली रेल्वे गाडी सोडण्यात आली.
मध्य रेल्वेच्या ताकारी ते किर्लोस्करवाडी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण नुकतेच पूर्ण झाले असून या मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने नुकतीच विजेवरील इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता दुहेरीकरण झालेल्या या मार्गावरून पहिली एक्सप्रेस सोडण्यात आली. ताकारी रेल्वे स्टेशन येथून हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ही गाडी किर्लोस्करवाडीकडे रवाना करण्यात आली. दुहेरी करण्याच्या कामाबद्दल रेल्वे कर्मचाऱ्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.