सातारा / प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या विरोधात गरळ ओकणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पडळकर यांनी मागील काही दिवसापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे व सोलापूर येथे सभेत रात्र गेली हिशोबात पोरग? नाही नशिबात असे अश्लील व भडक वक्तव्य करुन आपली प्रसिद्धी करुन घेतली. शरद पवार यांना बदनामीकारक भाषा वापरली आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाच्या निदर्शनास हेमंत पाटील यांनी आणून दिले. कलम 120, 159, 146, 500 नुसार गुन्हे दाखल करुन पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात कोणते ही अपशब्द वापरु नये, असे जनहित याचिकेत म्हटले आहे.
पडळकर हे सतत शरद पवार यांच्या विरोधात काहीही बोलुन आपली लायकी घालवत असतात. नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचा राजकीय सल्ला घेत असतात व भाजपाचे केंद्रीय मंत्री बारामतीतील विकास कामे पाहणी करण्साठी बारामतीचा दौरा करत असतात. त्यामुळे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना अशी वक्तव्य करणे शोभत नाही, असे हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.