पणजी / वार्ताहर
जातीवंत कलाकार हा आपली कला शेवटपर्यंत जतन करतो आणि कलाकार हा त्याच्या कलेमुळेच अजरामर असतो,असे स्पष्ट करून बुजुर्ग घरंदाज गायक पं. कमलाकर नाईक यांनी, अभिजात शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या गोमंतक मराठा समाजाच्या कलाकारांचे योगदान फार मोठे आहे तेव्हा कला विषयक उपक्रम संस्थेने राबवावेत असे आवाहन केले.
गोमंतक मराठा समाजाच्या तिसवाडी तालुका समितीतर्फे प्रसिद्ध तबला तथा पखवाजवादक स्व. गजानन आमोणकर यांच्या स्मरणार्थ
रविवारी पंधरावर्षांखालील स्पर्धकांसाठी तबलावादक स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळय़ात पं. नाईक प्रमुख पाहुणे यानात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे समाजाच्या केंद्रीय समितीचे माजी अध्यक्ष उमेश नाईक,तिसवाडी समितीचे सल्लागार भालचंद्र आमोणकर, समितीच्या अध्यक्ष सौ. सुनीता पेडणेकर, केंद्रीय समितीच्या सदस्या ऍड हर्षा नाईक व सौ उत्कर्षा बाणास्तरकर,मान्यवर परीक्षक पं. उल्हास वेलिंगकर व नितीन कोरगावकर, स्पर्धेचे समन्वयक गोरख मांदेकर व गजानन
आमोणकर यांचे बंधू शशिकांत आमोणकर(माजी नगरसेवक) उपस्थित होते.
पं.नाईक म्हणाले,गजानन आमोणकर हा ’गजू’ नावानेच सर्वपरिचित होता. तो कलाकार म्हणून मोठा होता त्यापेक्षा माणूस म्हणून मोठा होता.कोणाच्याही मदतीला तो तत्पर असायचा.सुनीता पेडणेकर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले,की गजू हा सदा हसमुख कलाकार होता. नाटकातही आमच्याबरोबर त्याने उत्कृष्ट भूमिका वठविल्या होत्या. त्याची स्मृती जागवावी या उद्देशाने ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे.
ऍड. हर्षा यांनी सांगितले, की बक्षीस मिळविण्यापेक्षा सस्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे असते.पालकांनी मुलांना कलेसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. उमेश नाईक म्हणाले, ही स्पर्धा दरवषी व्हावी यातून नव्या होतकरू कलाकारांना उत्तेजन मिळेल. गजू हा खूप प्रेमळ व परोपकारी होता. शशिकांत आमोणकर व गजू यांचे मेहुणे अजित कांबळी यांनीही भावना व्यक्त केल्या. परीक्षकांच्यावतीने नितीन कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
तिसवाडी समितीच्या कोषाध्यक्ष सौ. श्रद्धा नाईक, सौ. सिमरन काकोडकर यांनी मान्यवरांना पुष्यगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. रोहिदास नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव प्रशांत माशेलकर यांनी आभार मानले.
तबला स्पर्धेत निनाद आजरेकर प्रथम
तबलावादन स्पर्धेत निनाद नितीन आजगावकर याने प्रथम पारितोषिक पटकाविले. सारंग बाळा केरकर याला द्वितीय तर सिद्धराज सिध्दारुढ म्हामल याला तुतीय पारितोषिक प्राप्त
झाले. साईदिप गुणाजी शेटगावकर,संस्कार सतीश धुमाळ व दिपतेज चंद्रशेखर रेवोडकर याना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.