27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजन : स्वागताध्यक्ष, आमदार दयानंद सोपटे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे आयोजित 28 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन यंदा 27 व 28 नोव्हेंबर रोजी पेडणे येथे होणार आहे. त्यासंबंधी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल गावस, कार्यवाह सुहास बेळेकर, खजिनदार राजमोहन शेटय़े, सदस्य प्रकाश तळवडेकर, हेमंत खांडेपारकर, चंद्रकांत सांगळे, किशोर किनळेकर, दत्ताराम मोपकर, जयवंत नाईक, आदींची उपस्थिती होती.
वळपे पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये नगरात हे संमेलन होणार असून दि. 27 रोजी दुपारी 3 वाजता श्रीभगवती मंदिरापासून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. त्यानंतर 3.30 वाजता केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, संमेलनाध्यक्ष विजय कापडी, सन्माननीय अतिथी संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराज यांचे आठवे वंशज डॉ. सदानंद मोरे, साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांची उपस्थिती असेल.
सायं. 5 वाजता ’2000 नंतरचे गोमंतकीय मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात परेश प्रभू, डॉ. जयप्रभू कांबळे (कथा), प्रा. अरुण नाईक (ललित आणि कविता), राजू नाईक (बालसाहित्य), प्रा. विनय बापट (कादंबरी) यांचा सहभाग असेल.
सायं. 6 वाजता कवी संमेलन होणार आहे. त्यात पुष्पाग्रज, दशरथ परब, पौर्णिमा देसाई, दादू परब, शीतल साळगावकर, शर्मिला प्रभू, विनोद नाईक, लक्ष्मण पित्रे, दुर्गाकुमार नावती, महेश पारकर, शंभू भाऊ बांदेकर, कविता बोरकर, माधव सटवानी, प्रकाश क्षीरसागर, गौरी भालचंद्र, चंद्रशेखर गावस, मंगेश काळे, निवृत्ती शिरोडकर, प्रकाश तळवडेकर, दयाराम पाडलोस्कर, हिरा गावकर, श्रद्धा गवंडी, नूतन दाभोलकर, मुरलीधर बर्डे, शेखर खांडेपारकर, संगम भोसले, अलिशा गडेकर, यांचा सहभाग असेल.
सायं. 7.30 वाजता संगीत वारसा जपलेल्या निवडक प्रसिद्ध नाटकांचे प्रवेश सादरीकरण होणार असून त्यात मंदारमाला (गुरुकृपा संगीत संस्था, तांबोसे), चांदणे शिंपीत जा (श्रींची इच्छा थिएटर्स, हरमल), ययाती आणि देवयानी (अभिनव कला थिएटर्स, मांद्रे), आणि शिक्का कटय़ार (सार्व. गणेशोत्सव सांस्कृतिक, क्रीडा संघ मोरजी) या नाटकांचा समावेश आहे.
दुसऱया दिवशी सकाळी 8 वा. भाव भक्ती आणि नाटय़संगीताचा पहाट धून हा कार्यक्रम होईल. त्यानंतर 9 वाजता गोमंतकीय मराठी साहित्यातील महिलांचे योगदान या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. अनिता तिळवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या परिसंवादात पौर्णिमा केरकर, प्राची जोशी, डॉ. प्रमदा देसाई, सोनाली सावळ देसाई यांचा सहभाग असेल.
सकाळी 10.15 वाजता डॉ. सदानंद मोरे यांची संगीता अभ्यंकर प्रकट मुलाखत घेतील. त्यानंतर 11.30 वाजता ’नव्या परिवर्तनाच्या दिशेने गोव्याची वाटचाल चालू आहे का?’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात किशोर शेट मांद्रेकर (पत्रकारिता), रमाकांत खलप (राजकारण), डॉ. मनोज कामत (अर्थकारण), प्रा. अनिल सामंत (शिक्षण), डॉ. प्रदीप सरमोकादम (पर्यावरण/लोकजीवन) यांचा सहभाग असेल.
दुपारी 1 वाजता ’मराठी भाषा आणि समाजमाध्यमे’ या विषयावर डॉ. नीता तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यात नरेंद्र नाईक (युवा पिढी), परेश नाईक (भाषिक अविष्कार) आणि विनय मडगावकर (अध्ययन आणि अध्यापन) सहभागी होतील. दुपारी 2.30 वाजता भरतनाटय़म, मराठी लोकनृत्ये व दशावतार यावर आधारित ’नृत्योत्सव’ होईल. त्याचे संयोजन शीतल तेली करणार आहेत.
संध्याकाळी 3.30 वा. बाबू आजगावकर, मंत्री गोविंद गावडे, विजय कापडी, दयानंद सोपटे, रमेश वंसकर, राजमोहन शेटय़े यांच्या उपस्थितीत समारोह सोहळा होईल. त्यानंतर 6.30 वा. तळावली फोंडा येथील महिला गटातर्फे प्रसाद सावंत लिखीत ’तुका आकाशा एवढा’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येईल.
याच कार्यक्रमात मनोहर कोरगावकर, अर्जून परब, यज्ञेश्वर निगळे, रमाकांत पायाजी, चंद्रकांत जाधव, साईदास आपटे, सुधाकर प्रभू, वैशाली दुबळे, अवधूत कुडतरकर, शरदचंद्र देशप्रभू, गोविंद नाईक, प्रकाश प्रभुदेसाई, गुरुदास फडते, प्रकाश तळवणेकर, विनायक खेडेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.