सर्वोत्कृष्ट बागायतदार पुरस्कार प्रदान : भागधारकांना 16 टक्के लाभांश जाहीर
प्रतिनिधी /फोंडा
गोवा बागायतदार खरेदी विक्री संस्थेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शांतीनगर फोंडा येथील यशवंत सभागृहात पार पडली. यावेळी सन 2021-22 या वर्षीचा सर्वोत्कृष्ट बागायतदार पुरस्कार सातोडे केरी, सत्तरी येथील नारायण गजानन बर्वे यांना प्रदान करण्यात आला. तसेच भागधारकांना 16 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष विनायक सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते. अध्यक्ष विनायक सामंत यांनी वार्षिक उलाढालीचा आढावा घेतला. कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्या सहकार्याने व सेवकांच्या चांगल्या कामगिरीमुळे संस्थेने अपेक्षीत लक्ष्य पूर्ण केले. संस्थेने होंडा येथे भारत सरकारच्या सहकार्याने कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करुन शेतकऱयांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच शिरोडा येथील संस्थेच्या शाखेचे सर्व व्यवहार एकत्रीत स्थलांतरीत करण्यासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन व्यवहार सुरु पेल्याची माहिती दिली.
सभासद व सेवकांच्या गुणवंत मुलांचा शैक्षणिक प्रगतीबद्दल गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट सेवक व यावर्षी निवृत्त होणाऱया ज्येष्ठ सेवकांचा सत्कार करण्यात आला. सभेत वर्ष 2021-22 चे व्यापारीपत्रक, नफातोटापत्रक, ताळेबंद, अंदाजपत्रक व वार्षिक अहवाल सर्वानुमते संमत करण्यात आला. संस्थेने सन 2021-22 या वर्षांत रु. 491.63 कोटींची उलाढाल केली असून त्यावर संस्थेला रु. 644.24 लाख निव्वळ नफा झाला आहे. नफ्यातून भागधारकांना 16 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत विकास प्रभू, बाळ सहकारी, संदेश प्रभूदेसाई, श्याम सांगोडकर, समीर सामंत, प्रकाश जांबळे, सचिन तेंडुलकर, वामन बापट आदी सभासदांनी भाग घेतला. संचालक सुदिन मराठे, अशोक जोशी व कार्यकारी संचालक उल्हास उमर्ये यांनी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.