अनमोड येथील हत्तीब्रिजवर खड्डे पडल्याने वाहने अडकली
वार्ताहर / रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावर तिनईघाटापासून अनमोड येथील हत्तीब्रिजवर मोठमोठे खड्डे पडल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथे वाहने अडकून पडली आहेत. याकडे कोणीही लक्ष न दिल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हत्तीब्रिजच्या दोन्ही बाजूने 500 वाहने अडकून पडली आहेत. तर सदर जंगलात कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने तसेच लॉकडाऊनमुळे तिनईघाट, अनमोडमध्येही दुकाने बंद असल्याने उपाशीपोटी रहावे लागत आहे.
या महामार्गाचे काम घेतलेली दिलीप बिल्डकॉन कंपनीही काम अर्धवटच सोडून गेली असून या महामार्गाकडे आता कोण लक्ष देणार, असा प्रश्न पडला आहे. सध्या पडलेल्या खड्डय़ांमध्ये थोडे दगड घातल्यास तात्पुरते तरी वाहने ये-जा करू शकतील. मात्र, हे काम कोण करणार, हा मोठा प्रश्न आहे. जवळच असणाऱया गोवा राज्यातून तेथील सरकारी अधिकारी, स्थानिक पुढारी यांच्याकडून सदर मार्ग तात्पुरता करण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत व मदतीसाठी हात पुढे करत आहेत.
सोमवारपर्यंत कर्नाटकातील संबंधित खात्याने महामार्ग दुरुस्त न केल्यास सोमवारपासून गोवा राज्यातील पुढारी व इतर नागरिक या रस्त्याचे काम करणार असल्याचे येथील पत्रकार निखिल असूकर यांनी कळविले आहे. अद्याप पावसाला सुरुवात नाही मात्र, पावसाळय़ात रस्ता पूर्णतः बंद होण्याची दाट शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर मार्गावर तिनईघाटपासून अनमोडपर्यंत 5 ते 6 किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहने अडकत आहेत. या ठिकाणी दगड व इतर सामग्री घातल्यास तात्पुरता वाहनांना मार्ग होईल. सदर वाहनधारक या मार्गावरच अडकून पडत आहेत. शिवाय लॉकडाऊनमुळे त्यांची उपासमारही होत आहे.