प्रतिनिधी / वास्को
गोवा माईल्सचे टॅक्सी चालक व इतर टॅक्सी चालकांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आहे. एकमेकांच्या गाडय़ा अडवणे, धमक्या देणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झालेले असून एकमेकांविरोधात पोलीस तक्रारी करणे सुरू झालेले आहे. बुधवारी दाबोळी विमानतळ व शेजारील महामार्गावरही या वादाचे पडसाद उमटले.
गेल्या दोन दिवसांपासून गोवा माईल्स व इतर टॅक्सी व्यावसायिकांमध्ये खटके उडत आहेत. गोवा माईल्सच्या टॅक्सी चालकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी त्यांच्या काही टॅक्सी चालकांना कळंगूट व इतर ठिकाणी मारहाण करण्यात आली. सदर टॅक्सी चालक दाबोळी विमानतळावरून प्रवाशांना घेऊन कळंगूट भागात गेले होते. व्यावसायिक कारणावरून त्यांना अडवून मारहाण करण्यात येत असल्याचे या चालकांचे म्हणणे आहे. मंगळवारी अशा घटनांमुळे कळंगूट व हणजूण पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही सरकारच्या नियमानुसार व्यवसाय करीत असून कोणताही बेकायदा प्रकार करीत नाही. त्यामुळे सरकारने आमच्याविरुद्ध होणाऱया मारहाण व दमदाटीच्या प्रकारांमध्ये लक्ष घालावे व त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी गोवा माईल्सच्या चालकांनी केली आहे.
कळंगुटमध्ये मंगळवारी गोवा माईल्सच्या चालकांना अटकाव सहन करावा लागल्याने दाबोळी विमानतळाजवळ या चालकांनी बुधवारी दुपारी कळंगुटहून विमानतळावर येणाऱया टॅक्सी अडवून त्यांना अटकाव करण्यास सुरुवात केली. आम्ही कळंगुटला येऊ नये तर तुम्ही दाबोळीला येऊ नका असा हेका गोवा माईल्सच्या टॅक्सीवाल्यांनी धरला. हा प्रकार पोलिसांच्या कानी पडताच त्यांनी हस्तक्षेप केला व परिस्थीतीवर नियंत्रण ठेवले. परंतु दाबोळीत गोवा माईल्सकडून कळंगुटहून येणाऱया टॅक्सी अडविल्या जात असल्याची माहिती लगेच कळंगूट व उत्तर गोव्यातील इतर भागांमध्ये पसरली. त्यामुळे या प्रश्नावर तणाव निर्माण होऊ लागला. कळंगूट, म्हापसा व इतर भागातून मोठय़ा संख्येने इतर टॅक्सी चालक वास्कोत येऊ लागले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर कडे करून टॅक्सी व्यावसायिकांना रोखले. शेवटी हे प्रकरण वास्को पोलीस स्थानकावर पोहाचले. त्यांच्या दत्तराज दाभोलकर या टॅक्सी व्यावसायिकास मारहाण झाल्याने यासंबंधी वास्को पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली.
अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत तसेच अखिल गोवा काळय़ा पिवळय़ा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सुनिल नाईक तसेच या संघटनांचे इतर पदाधिकारीही यावेळी हजर होते. कळंगूट किंवा इतर भागात गोवा माईल्सच्या चालकांना कुणीही मारहाण केलेली नसल्याचा दावा कामत यांनी केला आहे. मात्र, वास्कोत आपल्या पर्यटक टॅक्सीचालकांना अटकाव व मारहाण केली जात असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही वास्कोत दाखल झालेलो आहेत. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अटकेची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. गोवा माईल्सच्या चालकांना इतर टॅक्सी व्यावसायिकांच्या पोटावर पाय ठेवण्याचे प्रकार करू नका असे समजावून सांगण्यात आले होते. मात्र, ते ऐकत नाहीत आणि सरकारही त्यांच्यामुळे इतर टॅक्सी व्यावसायिकांना होणाऱया त्रासाकडे लक्ष देत नाही असे चेतन कामत तसेच सुनिल नाईक यांनी म्हटले आहे.