काँग्रेसची भाजप सरकारवर टीका विधानसभा अधिवेशनात जाब विचारणार
प्रतिनिधी / पणजी
विधानसभा अधिवेशन केवळ तीन-चार दिवसांचे ठेवले म्हणून विरोधी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गोवा लोकायुक्त कायद्यास दुरुस्ती करून तो आणखी कमकुवत करण्यात येत असून पालिका अध्यादेश काढण्यापूर्वी कोणालाच विश्वासात घेतले नसल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणले आणि अधिवेशनात त्यास विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले.
भ्रष्टाचार प्रकरणी गोवा लोकायुक्तांनी 23 अहवाल दिले असून त्यातील एकही प्रकरणात सरकार चौकशी करीत नाही, याकडे ऍड. रमाकांत खलप यांनी लक्ष वेधले. अनेक ज्वलंत विषयावरील प्रश्न विरोधी पक्षाने मांडले असून विधानसभेत ते उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षाची हवा काढून घेण्याचा डाव
पणजीत काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, आताचे अधिवेशन चारच दिवसांचे असले तरी पहिल्या दिवशी फक्त राज्यपालांचे अभिभाषण होणार असल्याने आणि इतर कामकाज नसल्याने प्रत्यक्षात अधिवेशन फक्त तीनच दिवसांचे आहे. मागच्या वेळी कोरोनामुळे अधिवेशन एक दिवसात आटोपले आणि नंतरचे (आता होणारे) अधिवेशन मोठय़ा कालावधीचे होणार म्हणून सरकारतर्फे सांगण्यात आले होते. 21 दिवसांचे घेण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती तथापि प्रत्यक्षात ती मागणी फेटाळण्यात आली असून फक्त 3-4 दिवसांचे अधिवेशन ठरवून विरोधी पक्षाची हवा काढून घेण्याचा हा डाव असल्याचे कामत व खलप म्हणाले.
मोटर वाहतूक कायदा लागू करु नये
लोकायुक्त कायद्यास दुरुस्ती म्हणजे लोकायुक्तांचे पंख छाटण्याचाच हा प्रकार असल्याचे सांगून ते म्हणाले की पालिका अध्यादेशाला काँग्रेस पक्ष विरोध करणार असून तो चिकित्सा समितीकडे पाठवण्याची शिफारस करणार आहे. नवीन मोटार वाहन कायद्याबाबत सरकार समन्वय नाही व गोंधळच माजवला जात आहे. रस्ता साधनसुविधा होत नाहीत तोपर्यंत तो कायदा लागू करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
लोकायुक्तांनी दिलेले निवाडे पुढे नेऊन त्यांची चौकशी करण्याचे धाडस हे सरकार करीत नाही. करण त्यातून या सरकारचा भ्रष्टाचार उघड होण्याची भीती आहे. उलट सरकारी अधिकारी, आमदार यांची चौकशी करायची झाल्यास सरकारची अनुमती घ्यावी, अशी अट सरकार घालते हे सर्व चुकीचे असून जनतेने याची दखल घेऊन डोळसपणे सावध रहावे, असे आवाहन खलप यांनी केले. यावेळी अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर पदाधिकारी उपस्थित होते.