कामकाज पहाटे 4.30 पर्यंत चालले
प्रतिनिधी /पणजी
गोवा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच विधानसभेचे कामकाज पहाटे 4.30 वाजेपर्यंत चालले. राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पासहीत सभागृहाचे 17 दिवसांचे कामकाज केवळ तीन दिवसातच आटोपण्याची घाई राज्य सरकारला लागली. त्यामुळेच अत्यंत महत्त्वाची विधेयके पहाटे सभागृहासमोर आणण्यात आली. यामुळेच सभागृहाचे कामकाज पहाटेपर्यंत ठेवणे सरकारला भाग पाडले.
गोवा विधासभेचे आजवर कामकाज जास्तीत जास्त पहाटे 2 वाजेपर्यंत यापूर्वी चालले होते. परंतु डॉ. प्रमोद सावंत सरकारने त्यावरही कहर केला. बुधवारी सकाळी 11.30 वा. सुरू झालेले अधिवेशन गुरुवारी पहाटे 4.30 वा. संपुष्टात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह सभागृहात अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. विधानसभेसमोर प्रचंड कामकाज होते. एकाच दिवशी सुमारे 30 खात्यांवर चर्चा, असंख्य विधेयके संमतीसाठी आणि दाखल करून घेण्यासाठी सभागृहासमोर राज्य सरकारने आणले.
बारा नंतर सुरु झाली मंत्र्याची उत्तरे
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे रात्रौ 12 नंतर बोलण्यास उभे राहिले त्यानंतर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना अनेक मंत्र्यांनी रात्रौ पावणे एक वाजल्यानंतर उत्तरे देण्यात सुरवात केली. त्यानंतर पहाटे उशिरा खनिज विकास महामंडळ सारखी अनेक महत्त्वाची विधेयके सभागृहात दाखल करून घेण्यात आली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 28 जुलै रोजी पहाटे सुमारे 1.30 वा. कामकाज संपुष्टात आले. दुसऱयां दिवशीचे कामकाज हे शुक्रवारी पहाटे 4.30 वा. संपुष्टात येऊन गोव्याच्या इतिहासात प्रथमच हा एक नवा रेकॉर्ड तयार केला. सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. विरोधी पक्षाचे मात्र अवघेच काही आमदार उपस्थित होते.