1 लाख रोख रक्कमेसह तिघांना अटक
प्रतिनिधी /पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) गोवा वेल्हा येथे जुगार अडय़ावर छापा मारून तीन संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून 1 लाख रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच इतर काही सामान जप्त केले आहे. संशय़ितांच्या विरोधात जुगार कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये पीटर वालीस (मेणकूरे), पांडुरंग कुंकळीकर (मेणकूरे), बेनी गोन्साल्वीस यांचा समावेश आहे. गोवा वेल्हा परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करून संशय़ितांना रंगेहाथ अटक केली आहे. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहे.