पणजीहून केरळच्या परतीच्या मार्गावर असताना घटना चालक, विद्यार्थ्यासह 44 प्रवाशी सुखरूप
वार्ताहर /माशेल
फोंडा-पणजी महामार्गावरील बाणस्तारी पुलाजवळ एका धावत्या टुरिस्ट प्रवासी बसने अचानक पेट घेतला. आगीने घेतलेल्या रौद्ररूपात बस पुर्णता आगीत जळून खाक झाली सुदैवाने चालक, सहचालकांसह विना दुखापत सर्व प्रवाशी सुखरूप बचावले. सदर घटना काल शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. सुमारास उघडकीस आली. याकामी ओल्ड गोवा अग्निशामक दलाने महत्वाचे मदतकार्य केले.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार केरळ येथील एका महाविद्यालयातील 37 विद्यार्थ्यासह स्टडी टुरवर आलेल्या टुरिस्ट बस केएल 40 पी 3727 ला बाणस्तारी येथे अचानक आग लागली. आगीत बस पुर्णता बेचिराख झाली असून सर्व 44 प्रवासी सुखरूप बचावले. यामध्ये कुत्तुर केरळ येथलि जेबीस् ट्रेनिंग बीएड महाविद्यालयाचे 37 विद्यार्थी होते. त्याच्या दिमतीला प्राचार्य डॉ. एम व्ही विजयकुमारसह दोघेजण शिक्षक व बसचालकांसह तीघे क्लीनर मिळून एकूण 44 प्रवासी 30 मार्च रोजी अभ्यास दौऱयाअंतर्गत एक्सनीक दिकमंबरम ट्रेव्हल टुर ऑपरेटर बसने केरळहून गोव्यात दाखल झाले होते. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर परतीच्या वाटेवर असताना हा अपघात घडला. आग नेमकी कशी लागली याची माहिती कळू शकलेली नाही. आगीच्या थरारात उडालेल्या धावपळीत विद्यार्थ्यांच्या बॅगा, मोबाईल, मोबाईल पावर बॅक, रोकड तसेच गावी नेण्यासाठी गोव्यातून खरेदी केलेले सामान आगीत भक्ष्यस्थानी सापडले नुकसानीचा नेमका आकडाही मिळू शकला नाही.
याप्रकरणी प्रवाशांनी आपल्या मूळ गावी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या पालकांना सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली असून तात्काळ मूळ गावाहून टुर ऑपरेटरतर्फे विद्यार्थ्याना नेण्यासाठी दुसऱया बसची सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य विजयकुमार यांनी दिली आहे.
आल्ड गोवा अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवले तोपर्यत बस आगीत खाक झाली होती. पणजी फोंडा महामार्गावर सायंकाळच्या वेळी गजबजलेल्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवताना पुंडई येथील एक बंब व ओल्ड गोवा अग्निशामक दलाच्या 14 जणांच्या फायर फायटरच्या टिनमे महत्वाचे सहकार्य करून परिस्थिती आटोक्यात आणली. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सहाय्यक उपनिरीक्षन विनोद साळूंके अधिक तपास करीत आहे.