क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोव्याचे माजी रणजीपटू जॅरी फर्नांडिस यांचे गुरूवारी अल्प आजाराने निधन झाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी असलेल्या जॅरीने गोव्याचे 9 रणजी सामन्यांत प्रतिनिधीत्व केले.
मिळालेल्या माहितीनुसार बाहेरून बंद असलेल्या पर्वरीस्थित त्यांच्या निवासस्थानी जॅरी फर्नांडिस बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांना जीएमसीत नेण्यात आले होते. तिथेच त्यांना मृत्यू आला. मुळ पुण्याचे रहिवासी असलेले जॅरी फर्नांडिस गोव्यात आले आणि त्यांनी रणजी क्रिकेट संघात स्थान मिळविले. 1988-89 क्रिकेट मोसमात आपली प्रथमक्षेणी क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केलेल्या जॅरीने 1994-95 पर्यंत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले.
रणजी क्रिकेट स्पर्धेतील 9 सामन्यांत जॅरीने 922 धावा देत 16 गडी बाद केले तसेच तीन एकदिवशीय लढतीत त्याने 129 धावा मोजत 6 विकेट्स मिळविल्या. रणजीमध्ये 3-107 आणि एकदिवशीय क्रिकेटमध्ये 4-21 असे त्याचे उत्कृष्ट पृथकरण होते. फलंदाजीत 9 सामन्यांतील 13 डावात 12.46 धावांच्या सरासरीने त्याने 162 धावा केल्या व यात सर्वाधिक 70 धावांचा समावेश होता.
पुण्यातील बीएमसीसी कॉलेजतर्फे आपली कॉलेज क्रिकेट खेळलेल्या जॅरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या 19, 22 वर्षांखालील क्रिकेट संघातून खेळला. तसेच त्यानी पुणे विद्यापीठ आणि विझी ट्रॉफीतही महाराष्ट्रचे प्रतिनिधीत्व केले. पुण्यात विलास क्रिकेट क्लबकडून खेळलेले जॅरी आपली गोव्यातील क्लबस्तरीय क्रिकेट चौगुले स्पोर्ट्स क्लबमधून जास्त खेळले. या व्यतिरिक्त पणजी जिमखानासाठीही जॅरी खेळला. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा जॅरी वेगवान गोलंदाज सुदीन कामत आणि प्रशांत पै काकोडेचा ओपनिंग स्पॅलमधील साथीदार होता.