अचानक रक्तदाब कमी झाल्याचे निमित्त : कुंभारवाडा मये येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : राज्यभरातून अनेकांनी घेतले अंत्यदर्शन
प्रतिनिधी / डिचोली
गोवा विधानसभेचे माजी सभापती तथा मये मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार अनंत विष्णू शेट (वय 58 वर्षे) यांचे काल रविवार 2 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वा. बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू असताना निधन झाले. त्यांना शुक्रवारी 31 जुलै रोजी इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्यांचे पार्थिव कुंभारवाडा मये येथील त्यांच्या निवासस्थानी रविवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले असता राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व श्रध्दांजली वाहिली.
अनंत शेट हे गेल्या शनिवारी 25 जुलै रोजी आपल्या निवासस्थानी बाथरूममध्ये पडल्याने त्यांची कंबर लचकली होती. त्यामुळे त्यांना बांबोळी येथे गोमेकॉत उपचारार्थ नेण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देऊन घरी पाठविण्यात आले होते. घरीच आराम घेत असतानाच शुक्रवारी अचानक त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा गोमेकॉत हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. शनि. 1 ऑगस्ट रोजी अचानकपणे त्यांचा रक्तदाब उतरल्याने त्यांना तातडीने आयसीयूत हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना पहाटे 3 वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सरकारी इतमामात अंत्यसंस्कार
कुंभारवाडा मये येथील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पूत्र अमरीश शेट यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. त्यांच्या पश्चात पत्नी अरूंधती, कन्या अक्षता व पूत्र अमरीश, भाऊ कालिदास, प्रेमेंद्र, दुर्गाराम, भावजया, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.
राज्यभरातून अनेकांनी घेतले अंत्यदर्शन
अनंत शेट यांचे पार्थिव सकाळीच कुंभारवाडा मये येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असता मये मतदारसंघातील मोठय़ा संख्येने त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावली होती. त्यात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो, आमदार ग्लेन टिकलो, दयानंद सोपटे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार दामू नाईक, मयेचे आमदार प्रवीण झांटये, माजी क्रिडामंत्री रमेश तवडकर, भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार नरेश सावळ, माजी सहकारमंत्री महादेव नाईक, माजी कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांदेकर, माजी आमदार किरण कांदोळर, धर्मा चोडणकर, भारतीय भाषा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर, मयेतील गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते संतोषकुमार सावंत, गोवंश रक्षा अभियान अध्यक्ष हनुमंत परब, मयेचे सरपंच तुळशीदास चोडणकर, उपसरपंच विश्वास चोडणकर इतर पंचसदस्य, मये मतदारसंघातील विविध पंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, आजी माजी जिल्हा पंचायत सदस्य यांनी उपस्थिती लावली होती.
पंचसदस्य ते सभापती पदापर्यंतचा प्रवास
अनंत विष्णू शेट हे सर्वप्रथम मये वायंगिणी या पंचायतीवर पंचसदस्य म्हणून निवडून आले होते. दोन वेळा या पंचायतीचे पंचसदस्य बनलेल्या शेट यांनी उपसरपंच पदापर्यंत मजल मारली होती. मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे सरपंचपदाचाही अतिरिक्त ताबा आला होता. त्यांनी मये पंचायतीत पंचसदस्य म्हणून आपल्या कामाला उभारी देताना मये जिल्हा पंचायत मतदारसंघावर जोरदार काम केले, त्यामुळे पंचसदस्य असतानाच 2005 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारांनी त्यांना सकारात्मक कौल देताना त्यांना जिल्हा पंचायत सदस्य बनविले. या पदावरून आपल्या कार्याचा नावलौकिक संपूर्ण मये मतदारसंघात गाजविला.
विरोधात असूनही केली अनेक विकासकामे
त्यांना 2007 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी बहाल करण्यात आली. या संधीचे सोने करताना त्यांनी सदर निवडणुकीत विजय संपादन केला. हा पाच वषीय आमदारकीचा कार्यकाळ त्यांनी विरोधात बसून काढला. तरीही त्यांच्यातील काम करण्याची क्षमता व वेगळीच शैली यातून त्यांनी विरोधी आमदार असतानाही अनेक कामे मये मतदारसंघात करून घेतली.
दुसऱयांदा विजयी होऊन बनले उपसभापती
त्यानंतर 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली. याही निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत सलग दोनदा आमदार बनण्याचा मान मिळविला. यावेळी राज्यात स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार स्थापन झाले आणि अनंत शेट यांना या सरकारात विधानसभेचे उपसभापदीपद देण्यात आले.
‘एक चांगले सभापती’ म्हणून नावलौकिक
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मनोहर पर्रीकर यांना गोवा राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यागून केंद्रात संरक्षणमंत्री पदाची धुरा सांभाळावी लागली. त्यामुळे गोव्यातील मंत्रिमंडळात मोठा बदल झाला आणि लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री बनले. उपसभापती असलेल्या अनंत शेट यांच्याकडे सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली. या पदाला न्याय देताना विधानसभेत आपल्या नम्र व साध्या स्वभावाने एक चांगला सभापती म्हणून नाव राखले.
2007 ते 2017 अशी दहा वर्षे मये मतदारसंघाचा आमदार तसेच उपसभापती व नंतर सभापती म्हणून पदभार सांभाळल्यानंतरही भाजप पक्षाने त्यांना 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती. सदर उमेदवारी काँग्रेस पक्षाचे माजी उमेदवार प्रवीण झांटये यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना देण्यात आल्याने अनंत शेट त्याकाळात पक्षावर नाराज झाले होते. त्यांची नंतर संघटन सचिव सतीश धोंड, तत्कालीन रक्षामंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या घरी उपस्थिती लावून समजूत काढली होती. तसेच त्यांना मानाचे स्थान देण्याचे वचनही दिले होते. त्यानंतर ते निवडणूक प्रचारकार्यात काही भागात सहभागी झाले होते.
पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता हरपला : मुख्यमंत्री
राजकारणात सदैव आपल्या साध्या आणि नम्र स्वभावाने सर्वांच्या मनात घर केलेल्या अनंत शेट यांच्या निधनाने पक्षाने एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे. त्यांनी मये मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी केलेल्या कार्याचा पक्षाला आजही लाभ होतच असून त्यांची स्मृती या मतदारसंघात निरंतर राहणार आहे. त्यांच्या अकाली निधनाने अतीव दुःख झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
अनंत शेट यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी : सभापती पाटणेकर
माजी सभापती अनंत शेट हे एक अजातशत्रू होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कोणाशीही कधीच वैरत्व घेतले नाही. केवळ आपल्या समाज आणि मतदारसंघाच्या विकासासाठी झटणाऱया त्यांच्या वृत्तीची प्रशंसा कितीही केली तरी कमीच आहे. सभापती म्हणून त्यांनी राज्याच्या विधानसभेत केलेले कार्य मोठे असून त्यांच्या स्वरूपात एक विनम्रशील नेत्याला राज्य मूकले आहे, अशा शब्दांत सभापती राजेश पाटणेकर श्रद्धांजली वाहिली.
चांगल्या नेत्याचा अकाली अंत मनाला दुःख देणारा : लक्ष्मीकांत पार्सेकर
आपण मुख्यमंत्री असताना अनंत शेट हे सभापती होते. त्यांनी आपला साधा स्वभाव विधानसभेतही कायम ठेवला होता. सभापती म्हणून काम करताना कधीही त्यांनी कोणाला दुखावले नाही. सर्वांना समान न्याय देताना त्यांनी आपल्या नावाचा सन्मान वाढविला होता. त्यांच्या अकाली निधनाने मनाला दुःख झाले आहे, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
डिचोली पत्रकार संघातर्फे श्रध्दांजली
माजी सभापती तथा मयेचे माजी आमदार अनंत शेट यांच्या निधनामुळे डिचोली पत्रकार संघाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक राजकीय नेता या नात्याने अनंत शेट यांनी पत्रकारांचा सदैव आदर बाळगला. कधीही कोणत्याही पत्रकाराविरोधात त्यांनी अपशब्द वापरले नाहीत. आमदार म्हणून सत्तेत किंवा विरोधातही राहून आपल्या मतदारसंघातील कामे कशी करावी, त्यांचा पाठपुरावा कसा करावा, हे गुण त्यांच्याकडून आत्मसात करावे. सदैव हसतमुख व समोर आलेल्या व्यक्तीची व्यथा ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती सर्वत्र प्रिय होती. त्यांच्या निधनाने एक विनम्रशील नेत्याला समाज मुकला आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी यांनी व्यक्त केली आहे.
‘गुज’ कडून श्रद्धांजली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती अनंत शेट यांच्या निधनामुळे ‘गुज’ पत्रकार संघटनेने दुःख व्यक्त केले आहे. ते एक चांगले मुर्तीकार म्हणून प्रसिद्ध होते. दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. ‘गुज’ तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.