मंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचा इतिहास, प्राचीन साहित्यावर अभ्यास, संशोधन होणे गरजेचे आहे. गोव्याची लोकपरंपरा, संस्कृती, गोव्यावर झालेले आक्रमण, ऐतिहासिक काळातील पत्रव्यवहार या मोडी लिपीमध्ये आहेत. कालांतराने यात बदल होत गेला आहे. गोव्यासाठी हा एक महत्त्वाचा ठेवा आहे. गोव्याचा इतिहास सांगणारे महत्त्वाचे दस्तऐवज हे मोडीलिपीमध्ये आहेत. ते खूप जुने असून त्याचे भाषांतर करून सामान्यांसाठी खुले करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुरातत्व व पुराभिलेखमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुरातत्त्व खात्यातर्फे संस्कृती भवन, पणजी येथे आयोजित केलेल्या मोडी लिपी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी बोलताना केले.
अभिलेखागार आणि पुरातत्व खात्याचे संचालक दीपक बांदेकर, साहित्यिक ज्योती कुंकळकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. गोव्याबद्दल ज्या घडामोडी इतिहासात घडल्या. शिवाय अनेक आक्रमण गोव्यावर झाली असताना अजूनपर्यंत गोव्याची संस्कृती टिकून राहिलेली आहे. या संस्कृतीबद्दलची माहिती मोडी लिपीमध्ये पुरातत्त्व विभागातर्फे जतन केली आहे. या मोडी लिपी प्रदर्शनाच्या माध्यमातून गोव्याच्या इतिहासाचे आकलन करण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ज्यांना प्राचीन साहित्यात रूची आहे त्यांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनात नागरिकांना मोडी आणि मराठी भाषेतील प्राचीन दस्तऐवज पाहता आणि वाचता येतील. मोडी लिपी ही मराठी भाषेची एक लिपी असून, तिचा वापर प्रामुख्याने मध्ययुगीन महाराष्ट्रात शीघ्र लेखनासाठी झाला. मोडी लिपीचे प्रदर्शन 16 ऑक्टोबर म्हणजेच येत्या रविवारपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.