प्रतिनिधी /वास्को
उत्तर प्रदेशमधील निवडणुक डय़ुटी आटपून आयआरबीच्या गोव्यातील 900 पोलिसांची कुमक मंगळवारी संध्याकाळी गोव्याकडे यायला निघाली आहे. उत्तर प्रदेशमधील जोनपूर जँक्शनवरून त्यांनी विशेष रेल्वेने गोव्याकडे प्रयाण केलेले असून गुरूवारी संध्याकाळी ते गोव्यात पाहोचणार आहेत. आयआरबीच्या खास सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची 900 पोलिसांची कुमक निवडणुक सेवेसाठी दि. 15 रोजी गोव्यातील निवडणुका आटपून उत्तर प्रदेशकडे रवाना झाली होती. निवडणुकीच्या पाचही टप्प्यात त्यांनी चोख सेवा बजावली. उत्तर प्रदेशमधील ज्हालोन, ललितपूर, बालिया, फतेहपूर, बंडाह, प्रतापगड, प्रयागराज, संत कबीरनगर, जोनपूर, मऊ, अशा एकूण दहा जिल्हय़ांमध्ये त्यांनी सेवा बजावली. सोमवारी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर परतीच्या प्रवासाच्या तयारीला लागलेल्या या पोलिसांनी काल मंगळवारी संध्याकाळी विशेष रेल्वेने गोव्याकडे प्रयाण केले. ते गुरूवारी संध्याकाळी गोव्यात पोहोचतील. या 900 पोलिसांशिवाय 400 पोलिसांच्या मतदानाच्या सोयीसाठी मध्यंतरी अतिरीक्त 400 पोलीस कदंब बसमधून पाठवावे लागल्याने गोव्यातील एकूण 1300 पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक डय़ुटी बजावलेली आहे.