केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा लाभणार असल्याचे आश्वासन केंद्रीय युवा व क्रीडा व्यवहारमंत्री किरण रिजिजू यांनी काल शनिवारी नावेली-मडगाव येथे बोलताना दिले. त्यांच्या हस्ते नावेली, मडगाव, फोंडा, कांपाल व सावळवाडा (पेडणे) येथील पाच इंडोर स्टेडियमचे डिजिटलच्या माध्यमातून एकाचवेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री मनोहर आजगांवकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू म्हणाले, आपल्या देशात कित्येक वर्षापासून विविध क्रीडा प्रकार खेळले जातात, परंतु, अद्याप आपल्या देशात क्रीडा संस्कृती रूजलेली नाही. गोव्यात, उत्तरपूर्व राज्ये व वेस्ट बंगाल या ठिकाणी फुटबॉल खेळाची संस्कृती आहे. हा भाग सोडल्यास ‘जीवनाचा मार्ग म्हणजे खेळ’ ही संकल्पानाच आपल्याकडे रूजली नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑलिम्पिक स्पर्धात भारताला एक-दोन बक्षिसांवरच समाधान मानावे लागते. यात बदल व्हायला पाहिजे व त्यासाठी आपण क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यावर भर दिलेला आहे. या बदलाचे फलित त्वरित मिळणार नाही पण, नक्कीच भविष्यात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी होताना दिसून येईल. सरकार एकटे काहीच करू शकणार नाही. सरकार आवश्यक गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा देईल. पण, लोकांचा सहभाग हा खुपच महत्वाचा असतो.
प्रत्येक राज्याने आपल्यावा आवडीच्या खेळावर भर द्यावा
टॉकियोत यंदा होणाऱया ऑलिम्पिकमधून चांगली कामगिरी होईल, त्यानंतर 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱया ऑलिम्पिकमध्ये क्रीडा क्षेत्रातील बदलाची झलक पाहायला मिळेल व 2028 मध्ये लॉस एंजल्स होणाऱया ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणाऱया दहा देशामध्ये भारताचा नक्कीच समावेश असेल असा आशावाद यावेळी क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक राज्यांनी आपल्या आवडीच्या खेळावर अधिक भर द्यावा व त्यात सर्वोत्तम कामगिरी होणार याकडे लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आपण, आपल्या खात्याअंतर्गत तशी स्पष्ट कल्पना अधिकाऱयांना दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या देशात विविध स्पर्धांचे आयोजन होत आहे. पण, क्रीडामैदानावर पाच टक्केसुद्धा लोकांची उपस्थिती नसते. अशाने क्रीडा संस्कृती होईल का? आज सर्वजण क्रिकेटवर बोलतात. पण, क्रिकेटच्या सामन्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो, त्यामुळे क्रिकेटच्या सामन्यासाठी मोठ मोठे पुरस्कर्ते लाभतात. अन्य क्रीडा प्रकारात लोकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास नक्कीच चांगले पुरस्कर्ते लाभणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा आढावा
गोव्यात होणाऱया 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाचा आपण काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा खात्याचे अधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक घेतली व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे काम योग्यपद्धतीने चालले आहे. गोव्यात होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्कीच चांगल्या दर्जाच्या होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोवा हे छोटे राज्य असून कोणत्याही राष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमाचे सर्वोत्तम आयोजन या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आपल्या डोक्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन कसे होईल, याबद्दल कोणतीच शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी केंद्र व राज्य सरकार यांना संयुक्तरित्या काम करावे लागणार आहे. केंद्र सरकारलासुद्धा थोडे ओझे पेलावे लागणार आहे. त्याच बरोबर राज्य सरकार आपल्या क्षमतेनुसार योगदान देईल, आपण भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला गोवा सरकारसोबत जवळून काम करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्य सरकार 750 कोटी खर्च करणार
सरकार सातत्याने विकासकामे राबवित आहे. परंतु, विरोधक खोटी विधाने करीत असतात. मात्र, लोकांनी अशा खोटय़ा विधानाना बळी पडू नये असे मत डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. गोव्यात होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर राज्य सरकार 750 कोटी रुपये खर्च करणार आहे. 500 कोटीहून जास्त रक्कम साधन-सुविधांवर खर्च केलेली आहे. शिवाय अद्याप 250 कोटी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नावेलीतील इनडोअर स्टेडियमला पर्रीकरांचे नाव
गोव्यात होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात 37 क्रीडा प्रकार असतील. त्यात गोव्यातील मुलांनी सहभागी होणे खुप महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. नावेलीत इनडोअर स्टेडियमला स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचपद्धतीने कांपाल-पणजी येथील मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियमला देखील मनोहर पर्रीकरचे यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर फोंडय़ातील इनडोअर स्टेडियमचे आमदार रवी नाईक यांच्यासाठी पुन्हा उद्घाटन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी क्रीडामंत्री मनोहर आजगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्यानेच या इनडोअर स्टेडियमची कामे मार्गी लागली. आत्ता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सुद्धा पूर्ण सहकार्य करीत आहेत. गोव्यात झालेल्या लुसोफोनिया गेम्स आपणच आणल्या होत्या. मात्र, त्याचे उद्घाटन करण्याची संधी रमेश तवडकर यांना मिळाली. आत्ता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन हे केवळ क्रीडा खात्याचे नसून संपूर्ण गोवेकरांचे असेल. त्याचबरोबर सर्व क्रीडा प्रकारात गोव्यातील खेळाडूचा सहभाग असला पाहिजे व त्यासाठी प्रशिक्षकांनी कामाला लागले पाहिजे अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो व बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी ही आपले विचार मांडले. व्यासपीठावर माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार दामू नाईक, पणजीचे महापोर उदय मडकईकर, मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक, क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे सीईओ अशोक कुमार, गोवा ऑलिम्पिक संघटणेचे गुरुदास भक्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला अशोक कुमार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर शेवटी व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.