क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गुजरातात सुरू असलेल्या सब-ज्युनियर बॉक्सिंग अंजिंक्यपद स्पर्धेत गोव्याच्या मुलींनी शानदार कामगिरी करताना एक सुवर्ण, तीन रौप्य व एक कास्यपदक प्राप्त केले.
गुजरातच्या फॅना पटेलला पराभूत करून गोव्याच्या अदिती फडतेने सुवर्णपदक प्राप्त केले. अंजली यादवला महाराष्ट्रच्या सोनियाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कास्यपदक मिळाले. या स्पर्धेत गोव्याच्या शिल्पीकुमारीला महाराष्ट्रच्या सुहानी, वैष्णवी आरोलकरला महाराष्ट्रच्या भक्ती चुंगे तर सेजल इंगळेला महाराष्ट्रच्या समृद्धी हिच्याकडून अंतिम लढतींत पराभव स्वीकारावे लागल्याने रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले.
गोव्याच्या संघांला पुरुषोत्तम फडते, नीलेश खानोळकर व विराज रंकाळे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत गोव्याच्या मुलांच्या संघाला एक सुवर्ण, चार रौप्य व एक कास्यपदक प्राप्त झाले.