क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
धारबांदोडा मैदानावर झालेल्या व्हिजुअल लिंक क्रिकेटर्स आयोजित वूमन्स टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मडगाव संघाने एकतर्फी विजयाची नोंद करताना काणकोण संघाचा 180 धावांनी एकतर्फी पराभव केला. मडगावच्या विजयात इब्तिझम शेख आणि संजुला नाईकने तडफदार शतके ठोकली.
प्रथम फलंदाजी करताना मडगाव संघाने इब्तिझम शेख (105 धावा), संजुला नाईक (102 धावा) आणि तेजस्विनी दुर्गदच्या 33 धावांच्या बळावर 2 बाद 271 धावा केल्या. काणकोण संघासाठी जोशिता गावकरने एक गडी बाद केला.
उत्तदाराखल काणकोण संघाने निर्धारीत 20 षटकात 7 बाद 91 धावापर्यंत मजल मारली. त्यांच्या सयानी राऊत देसाईने सर्वाधिक 53 धावा केल्या. मडगावसाठी तेजस्विनी दुर्गदने 4 तर खुशी बांदेकरने 3 गडी बाद केले. या लढतीत वुमन ऑफ दी मॅच पुरस्कार इब्तिझम शेख आणि संजुला नाईक यांना विभागून देण्यात आले.