शेतकऱयाचा आनंद झाला द्विगुणीत
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गेल्या महिन्यापूर्वी गौंडवाड शिवारातून चोरटय़ांनी पॉवर टिलर चोरून नेले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबरोबर संतापही व्यक्त करण्यात आला होता. त्या पॉवर टिलरची शोधाशोध सुरू होती.
अखेर आपण पकडलो जाईन या भीतीने चोरटय़ांनी पुन्हा तो पॉवर टिल्लर चोरून नेलेल्या मूळ जागी आणून ठेवला आहे. यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. गौंडवाड येथील शेतकरी लक्ष्मण हिरामणी पाटील यांनी दिवसभर कडधान्य पेरणी केली. त्याच शिवारात दुसऱयादिवशीही कडधान्य पेरणी केली पाहिजे. यासाठी शिवारातच पॉवर टिलर ठेवून ते घरी परतले होते. हीच संधी साधत रात्री तो पॉवर टिलर चोरून नेला. दुसऱया दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने शोधाशोध केली. मात्र तो पॉवर टिलर सापडलाच नाही.
या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात शेतकऱयांनी फिर्याद केली होती. गेल्या महिन्याभरापासून हा पॉवर टिलर मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय तणावाखाली होते. ऐन कडधान्य पेरणीच्या काळातच पॉवर टिलर चोरून नेल्यामुळे शेतकऱयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न पडला होता.
नवीन पॉवर टिलर खरेदी करायचे तरी 50 हजार रुपयांची गरज असते. त्यामुळे ही रक्कम जमा करणे कठीण होते.
आनंद झाला द्विगुणीत
रोजच्यासारखे लक्ष्मण पाटील हे शेताकडे गेले असता त्यांना झाडाखाली पॉवर टिलर असल्याचे दिसून आले. त्यामुळे तातडीने ते तिकडे धावले. यावेळी त्यांनी पाहिले तर हा आपलाच पॉवर टिलर असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. चोरी गेलेला पॉवर टिलर पुन्हा चोरटय़ांनी आणून सोडला. यामुळे त्यांनी ही माहिती घरच्या लोकांना सांगितली. याबरोबर आजू-बाजूच्या शेतकऱयांनाही त्यांनी ही माहिती दिली. चोरून गेलेला पॉवर टिलर अखेर चोरटय़ांनी परत केल्याने याबाबत चर्चा सुरू आहे.