16 विद्यार्थी गंभीर जखमी : कारवार तालुक्यातील किन्नर येथील हायस्कूलमधील दुर्घटना
प्रतिनिधी /कारवार
मधमाशांनी हल्ला चढविल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या अबकारी खात्यातील निरीक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी सकाळी कारवार तालुक्यातील किन्नर येथील न्यू हायस्कूल परिसरात मधमाशांनी हल्ला चढविल्याने 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी 16 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांक्यतिरिक्त स्थानिक एक पुरुष आणि एक महिलाही जखमी झाली असून त्यांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी विद्यार्थी शाळेला जात असताना नारळाच्या झाडावरील मधमाशांनी अचानकपणे विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. त्यामुळे विद्यार्थीवर्गात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच आमदार रुपाली नाईक यांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी करून योग्य तो उपचार करण्याची सूचना डॉक्टरांना केली. यावेळी उपस्थित असलेल्या वनखात्याच्या कर्मचाऱयांना तातडीने शाळेजवळ असलेली मधमाशांची पोळी हटविण्याची सूचनाही नाईक यांनी केली. अलीकडच्या काळात कारवार आणि अंकोला तालुक्यात मधमाशांच्या हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.